मुंबईतील बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेची गुरूवारी सकाळी सात वाजता अंमलबजावणी करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनूसार याकूबला फाशी देत असताना नागपूर मध्यवर्ती कारागृहात सहा अधिकारी आणि एक वैद्यकीय पथक उपस्थित होते. याशिवाय, फाशीच्या शिक्षेपूर्वी याकूबने कुराण पठण केल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भातील अधिकृत निवेदन देणार आहेत. दरम्यान, फाशी दिल्यानंतर याकूबचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे, असे झाल्यास याकूबचा मृतदेह मुंबईत आणला जाईल.  त्यानंतर माहिम येथील दफनभूमीवर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या संवेदनशील भागातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुंबईत कालपासूनच अनेक ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली असून अनेकांना सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आले होते.
दरम्यान, या फाशीच्या पार्श्वभूमीवर नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या ५०० मीटरच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कलम १४४ अंतर्गत कारागृहाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी याकूबची डेथ वॉरंटसंदर्भातील याचिका फेटाळल्यानंतर गुरूवारी पहाटेपर्यंत या खटल्यात अनेक नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या होत्या.

Story img Loader