प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू हे सध्या महायुतीत आहेत. याआधी ते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. महायुतीचं सरकार आल्यानंतर बच्चू कडू यांना कोणतंही मंत्रीपद देण्यात आलं नाही. यासह इतर अनेक कारणांमुळे बच्चू कडू महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. बच्चू कडू हे महायुतीत असले तरी ते सरकारवर सातत्याने टीका करताना दिसतात. त्याचबरोबर केंद्रातल्या मोदी सरकारवरही टीका करत असतात. त्यामुळे बच्चू कडू हे लवकरच महायुतीतून बाहेर पडून महाविकास आघाडीशी हातमिळवणी करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच बच्चू कडू गुरुवारी (२८ डिसेंबर) शरद पवार यांची भेट घेणार असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीतले प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर आहेत. गुरुवारी ते वझ्झर येथील शंकर बाबा पापडकर यांच्या आश्रमाला भेट देणार आहेत. यावेळी बच्चू कडू आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याची चर्चा आहे. या भेटीवर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यशोमती ठाकूर यांनी काही वेळापूर्वी अमरावती येथे टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी ठाकूर यांना विचारण्यात आलं की, बच्चू कडू महाविकास आघाडीत येणार आहेत का? त्यावर आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, मला त्याबद्दल काहीच कल्पना नाही. बच्चू कडू महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. परंतु, माझ्याकडे त्याबद्दलची माहिती नाही. मुळात बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्याने तिकडे (महायुती) जायला नको होतं, असं म्हणायला काहीच हरकत नाही. ते महाविकास आघाडीत मंत्रीदेखील होते.

बच्चू कडूंची महायुती आणि भाजपावर नाराजी?

बच्चू कडू हे मराठा आरक्षणप्रश्नी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, राज्य सरकारकडून आश्वासनांची पूर्तता न झाल्याने त्यांनी राज्य सरकारबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच “दिलेला शब्द पाळता येत नसेल तर आश्वासनं देऊ नये”, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळाला दिला होता. त्यापाठोपाठ त्यांनी जातीनिहाय जनगणनेवरून केंद्र सरकारला टोला लगावला होता. “पशूंची गणना केली जाते, मग जातीनिहाय जनगणना का केली जात नाही? असा प्रश्न त्यांनी केंद्रातल्या भाजपा सरकारसमोर उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashomati thakur says if bachchu kadu returns to mahavikas aghadi will welcome asc