आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र आता श्राव्य (ऑडिओ) माध्यमाद्वारे रसिकांच्या भेटीला येत आहे. मुंबईच्या ‘एनसीपीए’ (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स) सभागृह येथे २३ मार्च रोजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते या सीडींचे प्रकाशन होणार आहे.  संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून राज्य मराठी विकास संस्थेने ‘कृष्णाकाठ’ श्राव्य माध्यमातून आणण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. संस्थेचे संचालक डॉ. अशोक सोलनकर, राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव प्रमोद नलावडे यांनी या प्रकल्पासाठी प्रकाश पायगुडे यांच्याशी संपर्क साधला. टिळक रस्त्यावरील स्टुडिओ एकलॉम येथे १ जानेवारी ते ३१ जानेवारी या अवघ्या एक महिन्यात हे आत्मचरित्र श्राव्य माध्यमासाठी ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. याविषयी माहिती देताना प्रकाश पायगुडे म्हणाले, यशवंतरावांचे हे आत्मचरित्र तीन भागांमध्ये आहे. त्यांचे अभिवाचन किरण यज्ञोपवीत, शशांक शेंडे व अभिनेते सचिन खेडेकर यांनी केले आहे. यशवंतरावांच्या राजकीय कालखंडाचे साक्षीदार असलेले माजी आमदार उल्हास पवार यांनी प्रत्येक भागाचे निरूपण केले आहे. ११ तास ९ मिनिटे या कालावधीचे ध्वनिमुद्रण झाले आहे. राज्य मराठी विकास परिषदेच्या संकेतस्थळावरून ‘कृष्णाकाठ’चे अभिवाचन डाऊनलोड करता येणार आहे. त्याचप्रमाणे यू-टय़ूबवरदेखील हे आत्मचरित्र तुकडय़ातुकडय़ाने ऐकता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा