महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३० व्या पुण्यतिथीदिनासाठी येत्या मंगळवारी (दि.२५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या काही सहकारी मंत्र्यांसमवेत कराड दौऱ्यावर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबरोबरच शरद पवार, आमदार पृथ्वीराज चव्हाण व अजित पवार हे राज्याचे नुकतेच पायउतार झालेले कारभारीही यशवंतरावांना श्रध्दांजली वाहण्यासाठी मंगळवारी कराड दौऱ्यावर येत आहेत.
प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहतील. त्यांच्यासमवेत महसूल मंत्री एकनाथ खडसे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा दौरा गृहीत धरून प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी गुरुवारी कराड येथे तातडीची बैठक बोलावत यशवंत कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा घेतला. सर्वच विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. तर, प्रदर्शन स्थळासह महत्त्वाचे रस्ते सुस्थितीत व विनावाहन थांब्याचे असावेत, सर्वत्र निर्जंतुकीकरण व डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात यावी, ठिकठिकाणचा कचरा हटवण्यात यावा, प्रशासनाने सतर्क रहावे अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तर, भाजपचे मुख्यमंत्री फडणवीस पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच कराडमध्ये येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून, या दौऱ्याकडे राजकीय जाणकारांच्या नजरा लागल्या आहेत.
सभासद नोंदणीचा प्रारंभ
पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच दौरा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपाचे शहराध्यक्ष घनश्याम पेंढारकर यावेळी उपस्थित होते. अॅड. पाटील म्हणाले, की प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला श्रध्दांजली अर्पण करून, समाधिस्थळी हिरवळीवर आयोजिलेल्या सुगमसंगीत व भावगीतांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. यानंतर फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. दरम्यान, भाजपाच्या सातारा जिल्ह्यातील सभासद नोंदणीचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते समारंभपूर्वक आयोजित केला आहे. येथील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही आयोजित केली असल्याचे भरत पाटील यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा