यशवंतराव मोहिते यांनी सहकार क्षेत्राला नवीन तत्त्वज्ञान आणि दिशा देण्याचे काम केले असून महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी केलेल्या भाषणांचा संग्रह प्रकाशित करण्याबरोबरच सहकार खात्यामार्फत दिला जाणारा पुरस्कार त्यांच्या नावाने देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.
राड तालुक्यातील िवग येथे यशवंतराव मोहिते यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम हे होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आनंदराव पाटील, विश्वजित कदम, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम, मदनराव मोहिते आदी उपस्थित होते.
यशवंतरावांनी प्रदीर्घ असे काम करून एक आगळे वेगळे नेतृत्व दाखवून दिले असे सांगून मुख्यमंत्री या वेळी म्हणाले, नवा विचार देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची जी ओळख आहे ती याच नेत्याच्या कार्यामुळे. कापूस एकाधिकार, सहकार चळवळीचे धोरण, कृषी विद्यापीठाची स्थापना याबाबतीत केलेले भाऊंचे कार्य हे राज्याला नवीन दिशा देणारे ठरले. सामान्य शेतक-यांचं सक्षमीकरण करण्यासाठी सहकार खात्याचे मूलभूत संशोधन करून त्यांनी सहकारी साखर कारखान्यांना चालना दिली. भाऊंनी त्या वेळी मांडलेले विचार नवीन तत्त्वज्ञान आणि नवी दिशा देणारे होते. याची प्रेरणा नवीन पिढीला मिळावी यासाठी त्यांनी केलेल्या भाषणांचा संग्रह शासनामार्फत प्रकाशित करण्यात येईल. तसेच सहकार खात्यामार्फत दिल्या जाणाऱ्या ९ पुरस्कारांपकी एक पुरस्कार भाऊंच्या नावे दिला जाईल, असेही ते म्हणाले.
आज साखर उद्योग अडचणीत आला हे केवळ काही कारखान्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, शेतक-यांच्या उत्पादनाला भाव मिळाला पाहिजे. यासाठी सहकारी साखर कारखाने शेतक-यांच्या मालकीचे असावेत हा निर्णय राज्य शासनाने घेतला. आज साखरेचे दर २ हजार ६०० आहेत. गेल्या वर्षी ३ हजार २०० होता. साखरेचे भाव कोसळल्यामुळे उसाच्या दरावर परिणाम होणार आहे. त्यामुळे साखर उद्योग कोसळणार नाही यासाठी राज्य आणि केंद्र सरकार निश्चितपणे प्रयत्न करेल. सहकारी चळवळ मजबूत नाही केली, त्यातील दोष नाही काढला तसेच ती सुदृढ नाही केली तर निश्चितपणे पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. म्हणून या साखर उद्योगासाठी मूलभूत विचार आम्ही करतोय, असेही ते म्हणाले.
रामीण भागातील शेतक-यांसाठी आणि सहकारामध्ये केलेलं भाऊंचं कार्य आदर्श घेण्यासारखे आहे, असे सांगून सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, राज्य बलशाली करण्याचं स्वप्न भाऊंनी पाहिलं आणि ते सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पावले टाकत असून सहकाराला शिस्त लावण्याचं काम त्यांनी केलं आहे. शेतक-यांना खरी गरज भांडवलाची असते. नवीन वर्ग शेतीसाठी पुढे येतोय. अशा शेतक-यांना ३५ हजार कोटींचे पीक कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. भविष्यामध्ये शुगर डेव्हलपमेंट फंड उभा करून त्यात साखर उद्योगाला मदत देता येईल का, त्या दृष्टीनेही शासनाचे प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
आपल्या कार्य कर्तृत्वाने भाऊंनी ठसा उमटविल्याचे सांगून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, भाऊंनी ‘कसेल त्याची जमीन, राहील त्याचे घर’ हा निर्णय घेतला. परिवहन खाते आल्यानंतर एस.टी. सुरू केली. कापसाचं उत्पादन शेतक-यांनी घ्यावं, सूत गिरण्या शेतक-यांनी काढाव्यात, कापडसुद्धा शेतक-यांनीच विणावं आणि त्याची विक्रीही शेतक-यांनी करावी हे भाऊंच स्वप्न होतं. त्यासाठी कापूस एकाधिकाराचा निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.
डोंगरातल्या एका छोटय़ा गावातील माझ्यासारख्या छोटय़ा माणसाला राज्याला दाखवायचं काम भाऊंनी केलं, असे सांगून वनमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, कोयना आणि वांग मराठवाडी पुनर्वसनाचे प्रश्न आम्ही गांभीर्याने घेतले आहेत. ते लवकरात लवकर सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.
या वेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, विश्वजित कदम, अतुल भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. इंद्रजित मोहिते यांनी स्वागत केले. तर आदित्य मोहिते यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बापूजी साळुंखे यांच्या पत्नी सुशीलादेवी साळुंखे यांच्या तलचित्राचे अनावरण करण्यात आले. ‘स्व. यशवंतराव मोहिते- आठवणींचा स्मृती करंडक’ या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्याच्या हस्ते या वेळी करण्यात आले. तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत सुवर्णा जयंत मदने यांना २० हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला. कराड परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने या शेतकरी मेळाव्याला उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा