नैसर्गिक सौंदर्य व धार्मिक स्थळाचा आकर्षणबिंदू म्हणजेच धारगड. शिवभक्तांचे आराध्य दैवत श्री क्षेत्र धारगड यात्रेला दूरवरून भक्त हर हर बोला महादेवाच्या गजरात दाखल होतात. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी यात्रा महोत्सव भरतो. महोत्सव उद्यापासून आहे.
धारगडला प्राचीन शिवालय असून, हे सातपुडय़ाच्या पर्वतरांगांमध्ये ३००० फूट उंचीवर नरनाळा किल्ल्याच्या छातीशी वसलेले आहे. येथे चारकोनी गुहा असून त्यात दोन स्वयंभू शिवलिंग व नंदी आहे. महादेवाचे हे शिवलिंग केव्हा व कसे निर्माण झाले, याचा कुठलाही ठोस पुरावा इतिहासात आढळत नाही. याबाबत आख्यायिका मात्र ऐकावयास मिळतात.
धारगड अमरावती जिल्ह्य़ातील चिखलदरा तालुक्यात असले तरी धारगडला जाण्याकरिता सोईचा मार्ग अकोला जिल्ह्य़ातील अकोटवरूनच आहे. धारगडसाठी अकोट आगारातून बसेसची व्यवस्था करण्यात येते असल्याने अकोटातील रस्ते भक्तांनी फुलून जातात. धारगड हे पूर्वी दुर्गम भागात होते, पण आता बसेससह खासगी वाहनेही शकतात. त्यामुळे श्री क्षेत्र शिवभक्तांच्या आवाक्यात आले आहे. धारगड अकोटवरून पाऊल वाटेने सुमारे २५ कि.मी.वर येत असून प्रमुख मार्गाने ३७ कि.मी. दूर येते. बहुतांश शिवभक्त पाऊल वाटेनेच जातात. अकोटपासून २५ कि.मी.वरील पूर्णा नदीच्या जलानी भरलेली कावड खाद्यांवर घेऊन भक्तगण अकोटवरून पोपटखेड मार्गाने जातात व मोठय़ा महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक करतात. धारगडचा धबधबा भक्तांवर जणू जलाभिषेक करतो. या यात्रेतील भक्तीचा महापूर श्रावणात पाहण्यासारखा असतो. सर्वत्र निसर्ग सौंदर्याला बहार आलेली असते.
प्रवेश व दर्शन मार्ग मोकळा
या यात्रेसाठी वेळेचे कोणतेही बंधन राहणार नाही. शिवभक्तांकरिता प्रवेशाचा व दर्शनाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या संदर्भात वनखाते, धारगड यात्रा सेवा समिती, तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वेळेच्या बंधनाचा वाद संपुष्टात आणला. यापूर्वी शिवभक्तांना वेळेचे र्निबध लादण्यात आले होते, त्यामुळे वनखाते व शिवभक्तांमध्ये संघर्ष पेटण्याच्या मार्गावर होता. या बैठकीत सकारात्मक चर्चा करून वन्यजीव व वनसंपत्तीची कुठलीही हानी होऊ नये, याची दक्षता घेऊन वेळेबाबत कसलाही र्निबध राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.