सांगली : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत जतमधील यल्लमा देवीच्या यात्रेस गुरुवारी गंधोटी विधीने प्रारंभ झाला. शुक्रवारी महानैवद्य आणि शनिवारी यात्रेचा मुख्य कार्यक्रम व नगर प्रदक्षिणा आहे. जतचे संस्थानिक श्रीमंत डफळे यांचे हे खासगी देवस्थान असून, दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली जिल्ह्यातील जतची ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या यल्लमा यात्रेस आजपासून सुरुवात झाली असून, मंदिरात आज गंधोटीचा कार्यक्रम पार पडला. उद्या पुरणपोळीचा महानैवद्य विधी होणार असून, शनिवारी देवीच्या पालखीची नगर प्रदक्षिणा आणि सायंकाळी कीच असा कार्यक्रम होणार आहे. कीच झाल्यानंतर मंदिराचे दार दर्शनासाठी बंद केले जाते. यानंतर सोमवारी अमावस्येच्या दिवशीच मंदिराचे दार उघडण्यात येते.

हेही वाचा >>>वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय

यात्रेनिमित्त मंदिर परिसरात दुकाने लावण्यात आली असून, मनोरंजनाची साधनेही मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. तसेच यात्रेच्या निमित्ताने सांगली बाजार समितीच्यावतीने खिलार जनावरांचा बाजार भरविण्यात आला आहे. यात्रेकरूंना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी दिली.

जतची यमा देवी मंदिर हे जतचे संस्थानिक डफळे यांचे खासगी देवस्थान असून लाखो भाविकांची या देवीवर श्रध्दा असल्याने दरवर्षी कर्नाटक, आंध्र व महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक येत असतात, असे विश्वस्त शार्दूलराजे डफळे आणि ज्योत्स्नाराजे डफळे यांनी सांगितले. यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही, याची दक्षता प्रशासन व विश्वस्त संस्थेच्यावतीने घेण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yatra of yallama devi begins in jat amy