यवतमाळ येथे होणाऱ्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका आणि कवयित्री अरुणा ढेरे यांच्या नावावर एकमत झाले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ डॉ. अरुणा ढेरे यांच्या गळ्यात पडली आहे. अशाप्रकारे संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला विराजमान होत आहे. ११ ते १३ जानेवारीदरम्यान यवतमाळमध्ये हे संमेलन होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळमधील पोस्टल मैदानावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी कोण असेल याबाबत साहित्य वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. अमरावतीच्या ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांचे नावही अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. प्रभा गणोरकर यांनी याआधीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नशीब आजमावून पाहिले होते. यवतमाळ येथे होत असलेल्या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार चार घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, संलग्न आणि समाविष्ट संस्थांकडून प्रत्येकी एक आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांकडून एक अशी नावे मागवण्यात आली होती. यामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने नावे माघारी घेतल्याने त्या नावांचा विचार केला गेला नाही. इतर नावांबाबत चर्चा झाल्यावर बहुमताने डॉ. अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे.

साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच साहित्यिका संमेलनाध्यक्षपद भुषवू शकल्या आहेत. १९६१ साली ग्वाल्हेर येथील संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमावती देशपांडे, १९७५ साली कराड येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गा भागवत, १९९६ साली आळंदी येथील संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके आणि २००१ साली इंदूर येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद विजया राजाध्यक्ष यांनी भुषवले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी २०१९ सालच्या यवतमाळ येथील संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ महिलेच्या गळयात पडणार का, याबाबत चर्चांना उधाण आले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal 92nd sahitya sammelan aruna dhere elected as president