यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी केवळ आठ दिवसांचा अवधी असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार नंदिनी पारवेकर आणि भाजप उमेदवार मदन येरावार या दोघांचीही दमछाक होत असली तरी त्यांनी तसेच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, काँग्रेसच्या प्रचारासाठी जिल्ह्य़ाबाहेरील, विदर्भ आणि विदर्भाबाहेरील नेत्यांचे दौरे सुरू झाले असून जिल्ह्य़ाबाहेरील जवळपास ५० नेत्यांनी यवतमाळातच तळ ठोकला आहे.
हर्षवर्धन पाटील, नितीन कुंभलकर, वर्षां गायकवाड, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, रणपिसे, माजी आमदार सुधाकर गणगणे यांच्यासह अनेक नेत्यांनी विविध समाजातील गटागटांच्या बठकी घेतल्या. काँग्रेसच्या अखिल भारतीय महिला सरचिटणीस संध्या सव्वालाखे यांच्या निवासस्थानी मंत्री वर्षां गायकवाड यांनी महिलांच्या बठकी घेऊन काही गावांना भेटी दिल्या. नंदिनी पारवेकरांना उमेदवारी मिळवून देण्यात मोठा वाटा उचललेल्या तिवसाच्या आमदार यशोधरा ठाकूर याही या मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांच्या सतत संपर्कात आहेत. प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांचाही दौरा निश्चित झालेला आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार वामनराव कासावार, इत्यादी महत्वाच्या नेत्यांनी अन्य सर्व कार्यक्रम रद्द करून यवतमाळात तळ ठोकलेला आहे.
राष्ट्रवादीच्या मनोहर नाईक आणि आमदार संदीप बाजोरीया यांनी नंदिनी पारवेकरांसाठी जीवाचे रान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करून शनिवारी निवडणूक प्रचाराचा श्री गणेशा केला. दुसरीकडे भाजपमध्ये उमेदवार मदन येरावार यांच्या प्रचारासाठी रा.स्व. संघाची आणि भाजपच्या विविध आघाडय़ांची प्रचार यंत्रणा कामास लागली आहे. खासदार हंसराज अहीर, आमदार चनसुख संचेती, आमदार डॉ. रणजित पाटील, माजी आमदार दिवाकर पांडे यांच्यासह लहान-मोठे कार्यकत्रे, पक्षांतर्गत मतभेद विसरून जोमाने भिडल्याचे चित्र दिसत आहेत.
ऐ मेरे वतन के लोगो..
काँग्रेसने ही निवडणूक अतिशय भावनिक बनवली आहे. जागोजागी दिवंगत आमदार नीलेश पारवेकर यांचे कटआउट्स लावून बाजूला उमेदवार नंदिनी पारवेकरांचे फोटो छापून नीलेश पारवेकरांना श्रद्धांजली देण्यासाठी पंजाला मतदान करा, असे आवाहन केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, प्रचारादरम्यान वाजवल्या जाणाऱ्या गीतांच्या ध्वनिमुद्रिकांमध्ये ‘ऐ मेरे वतन के लोगो जर याद करो कुर्बानी..’ हे गीत वाजवून मतदारांना राष्ट्रासाठी शहीद झालेल्या वीरांची आठवण करून दिली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal by election is a prestigious issue for congress and bjp