देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेच्या उमेदवारांनी आणि वेगवेगळ्या पक्षांनी देशभर प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना सोमवारी (१ एप्रिल) अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी १२,५०० रुपयांची चिल्लर (सुट्टे पैसे/नाणी) नामनिर्देशन पत्राबरोबर निवडणूक आयोगाकडे भरली आहे. गेडाम यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मनोज गेडाम यांनी १२,५०० रुपयांची चिल्लर निवडणूक विभागाकडे सुपूर्द केली होती. हे पैसे मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांची दमछाक झालेली पहायला मिळाली. त्यामुळे गेडाम यांनी ही रक्कम स्वतः मोजून निवडणूक विभागाकडे सादर करावी, असं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर गेडाम आणि त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी ही नाणी मोजून वेगवेगळ्या लहान पिशव्यामध्ये बांधून निवडणूक आयोगाकडे सादर केली.
हे ही वाचा >> केंद्राची माघार, काँग्रेसला दिलासा; निवडणूक होईपर्यंत दंडवसुली नाही; प्राप्तिकर खात्याची ग्वाही
सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांना स्थानि लोक गुरुदेव या टोपण नावाने ओळखतात. “मी गोरगरीब जनतेची अनेक वर्षे सेवा करत आलो आहे आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे. सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक जिंकणार आहे,” असं गेडाम म्हणाले. जनतेने दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यासाठी घेऊन आलो आहे, असंही त्यांनी सांगितलं.