माझ्या वडिलांनी आत्महत्या केली असा जबाब आम्ही दिलेला नाही. माझ्या वडिलांच्या मृत्यूवरुन राजकारण करु नका, असे आवाहन उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर गावच्या शेतकऱ्याच्या मुलाने केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सावळेश्वर या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातील एका वृद्ध शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला. माधव रावते (७६) असे या शेतकऱ्याचे नाव होते. रावते यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात स्वत: सरण रचून आत्महत्या केली, असा दावा ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी केला होता. तर पोलिसांनी शेतातील पऱ्हाटीच्या ढिगाला (वाळवलेली कापसाची झाडे) लागलेल्या आगीत होरपळून रावते यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. या घटनेनंतर विरोधकांनीही सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठवली होती. विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील माधव रावते यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. सावळेश्वर येथील ७६ वर्षीय शेतकरी माधव शंकर रावते यांनी १४ एप्रिल २०१८ ला पऱ्हाटीच्या गंजीला आग लावून त्यात उडी घेऊन आत्महत्या केली, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी १७ एप्रिलला दिला असताना माधवचा मृत्य अपघाती आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणा करीत आहे. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी विखे यांनी केली होती.

अखेर जवळपास महिनाभरानंतर सोमवारी माधव रावते यांचा मुलगा गंगाधऱ याने माझ्या वडिलांच्या मृत्यूवरुन राजकारण करु नका, असे आवाहन केले आहे. माझ्या वडिलांनी आत्महत्या केली, असा जबाब आम्ही दिलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अखेर, पोलिसांनी या वादावर तोडगा काढला आहे.