येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेले १७ करोनाग्रस्त उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे, त्यांना आज शुक्रवारी सुट्टी देण्यात आली. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६ वरून १९ वर आली होती. मात्र नव्याने पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या २४ वर पोहचली. नेर येथील पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन रूग्णांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने प्रशासनाने नेर येथे लक्ष केंद्रित केले आहे.
विलगीकरण कक्षात या २४ रूग्णांसह ३० जण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६७ वर गेली आहे. आतापर्यंत उपचारानंतर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या १४१ इतकी आहे. जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे.
दरम्यान गुरुवारी नेर येथील दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शहरातील तेलीपूरा व आनंदवाडी हा भाग जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
जिल्हाधिकारी सिंह यांनी आज शुक्रवारी नेर येथे प्रतिबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष भेट दिली. येथील प्रतिबंधित क्षेत्रात जवळपास एक हजार घरे असून पाच हजार लोकसंख्या आहे. या सर्व नागरिकांची थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑक्सीमीटरने आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या ९० चमू कार्यरत आहेत. नेर शहरात पाच फिवर क्लिनीक स्थापन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागास दिले. नेर येथील दोन रूग्णांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.