अचलपूर-मुर्तिजापूर-यवतमाळ नॅरोगेज रेल्वेमार्ग ब्रॉडगेजच्या प्रतीक्षेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहन अटाळकर, अमरावती</strong>

अचलपूर-मुर्तिजापूर-यवतमाळ या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी लागणाऱ्या खर्चातील ५० टक्के वाटा राज्य शासनाने उचलण्याबाबत रेल्वे मंत्रालयाने पत्रव्यवहार करूनही कुठल्याही हालचाली होत नसल्याने ‘शकुंतला’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रेल्वेचे रूप केव्हा पालटणार, हा प्रश्न कायम आहे.

मध्यंतरी ब्रॉडगेज रुपांतरणाऐवजी रेल्वेने हा मार्गच टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. या रेल्वे मार्गावरील आठ स्थानके बंदही करण्यात आली होती. पण, प्रवाशांच्या रेटय़ामुळे ही रेल्वेसेवा रखडत का होईना सध्या सुरू आहे. सुवर्णमय इतिहास लाभलेल्या या रेल्वेमार्गाकडे काही दशकांमध्ये संपूर्ण दुर्लक्ष झाले. १९१४ पासून सेंट्रल प्रोव्हिन्सेस रेल्वे कंपनीच्या (क्लिक अ‍ॅन्ड निक्सन कंपनी) ताब्यात असलेल्या मुर्तिजापूर-यवतमाळ (११३ कि.मी.), मुर्तिजापूर-अचलपूर (७७ कि.मी.) आणि पुलगाव-आर्वी (३५ कि.मी.) या २२५ किलोमीटर लांबीच्या नॅरोगेज रेल्वेमार्गाची मालकी या इंग्लंडमधील कंपनीकडेच आहे.

या तिन्ही रेल्वेमार्गाकडे रेल्वे प्रशासनाने वेगवेगळी कारणे दाखवून दुर्लक्ष केल्याचे आढळते. लोकसभेच्या याचिका समितीने या रेल्वेमार्गाच्या ब्रॉडग्रेज रुपांतराविषयी शिफारस केली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या मार्गाचे जुलै २००५ आणि ऑक्टोबर २००८ मध्ये प्राथमिक अभियांत्रिकी-वाहतूक सर्वेक्षण (पीईटीएस) केले. वेळोवेळी आर्थिक तरतूद आणि प्रवाशांच्या संख्येकडे बोट दाखवत रेल्वेने या मार्गाच्या रुपांतराकडे दुर्लक्षच केले.

रेल्वेने या मार्गाच्या ब्रॉडग्रेज रुपांतरासाठी २००४ मध्ये ४०० ते ५०० कोटी रुपये खर्च येईल, अशी माहिती लोकसभेच्या याचिका समितीला दिली होती. २००२-०३ या वर्षांत सरासरी ६११ प्रवाशांनी अचलपूर-मुर्तिजापूर प्रवास केल्याची आकडेवारी या वेळी सादर करण्यात आली होती. या भागात रस्त्यांचे चांगले जाळे आहे, ब्रॉडगेज रुपांतराचा खर्च मोठा आहे, अशी उत्तरे त्यावेळी देण्यात आली होती. रेल्वे याचिका समितीने मात्र शिफारस करताना रेल्वेचे देशभरातील जाळे पाहता, एवढय़ा छोटय़ा मार्गाची सुधारणा आणि प्रवाशांना चांगल्या सोयी पुरवणे रेल्वे प्रशासनासाठी अशक्य बाब नाही, असा शेरा लिहून ठेवला होता. दुसऱ्या सर्वेक्षणानंतर या संपूर्ण रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेज रूपांतरासाठी १५५४ कोटी रुपये खर्च येईल, असे सांगण्यात आले. ‘रेट ऑफ रिटर्न’ ‘निगेटिव्ह’ २.४५ टक्के होता. ब्रॉडगेज रूपांतरासाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के भार राज्य सरकारने उचलावा आणि जमीन नि:शुल्क द्यावी, यासाठी ६ मार्च २०१४ रोजी रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारला पत्रही पाठवले. त्यावर अजूनही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच या प्रकल्पाचे काम अडले आहे.

एके काळी वऱ्हाडातील कापूस मँचेस्टपर्यंत पोहोचवण्यासाठी साहाय्यभूत ठरलेल्या शकुंतला रेल्वेसाठी १९६०-६१ या वर्षांत बनोसा रेल्वे स्थानकावरून तीन लाख ११ हजार प्रवाशांनी तिकीट घेतल्याची तसेच चार हजार २३३ मेट्रिक टन मालवाहतूक झाल्याचीही नोंद ‘गॅझेटियर’मध्ये आहे.

रेल्वेमार्गाच्या सुधारणेसाठी गाडीत कविसंमेलन नॅरोगेज लोहमार्गावर खिळखिळी होऊन धावणाऱ्या या १०४ वर्षांच्या ‘शकुंतले’चा उद्धार व्हावा, यासाठी नुकतेच रेल्वेगाडीत प्रतिभा साहित्य संघाच्या वतीने कविसंमेलन भरवण्यात आले होते. कवींनी आपल्या प्रतिभेतून शकुंतलेचा प्रवास, तिची अवस्था रसिकांपुढे मांडली. अचलपूर स्थानकापासून सुरू झालेल्या या कविसंमेलनाचा समारोप सायंकाळी दर्यापूर स्थानकावर झाला. या वेळी रेल्वेगाडीला फुलांनी सजवण्यात आले होते. अचलपूर रेल्वे स्थानकावर खासदार आनंद अडसूळ, नगराध्यक्ष सुनीता फिस्के, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, पंचायत समिती सभापती देवेंद्र पेठकर आदींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अचलपूर ते दर्यापूर दरम्यान शकुंतलेचा प्रवास सुरू असताना वाटेत विविध रेल्वेस्थानकांवर गावकऱ्यांनी कवींचे आणि प्रवाशांचे स्वागत केले. अंजनगाव स्थानकावर ज्ञानपीठ शाळेच्या विद्यार्थ्यांनी फुले उधळली, बॅण्ड पथकाने सलामी दिली. शकुंतलेचे कापूसतळणी, कोकर्डा आणि दर्यापूर येथेही स्वागत करण्यात आले. समारोपाला नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, आरोग्य सभापती बळवंत वानखडे, विजय विल्हेकर, विठ्ठल कुलट, जितेंद्र रोडे आदी उपस्थित होते. या वेळी शकुंतलेचे चारही डबे प्रवाशांनी खच्चून भरलेले होते.

मुख्य डब्यात शैलेश लोखंडे यांनी शेतकरी आत्महत्या आणि पर्यावरण या विषयावर चित्रप्रदर्शन मांडले होते. समारोपात कार्यक्रमात कवी डॉ. सतीश तराळ, विजय सोसे, गजानन मते, राजाभाऊ  धर्माधिकारी, नितीन देशमुख, मंगेश वानखडे, गौतम गुळदे, राजीव शिंदे, ओमप्रकाश ढोरे, प्रा. चंद्रशेखर तारे, प्रवीण कावरे, प्रा. गौतम खोब्रागडे, प्रशांत कोल्हे, चंद्रकांत बहुरूपी, विनोद घुलक्षे, विजय डकरे यांचा सत्कार करण्यात आला.

कविसंमेलनादरम्यान राजाभाऊ धर्माधिकारी यांनी ‘आज लोकशाहीले शकुंतलेसाठी आंदोलन करायचं काम पडलं’, प्रा. राजू शिंदे यांनी ‘माही शकुंतला आहे विदर्भाची शान’, तर अन्य कवीनीही शकुंतलेच्या प्रवासावर कविता सादर करून दाद मिळवली. अचलपूरवरून सुरू झालेल्या या कविसंमेलनात कवींनी शकुंतलेच्या व्यथा व शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.

शकुंतलेचे ब्रॉडगेज रूपांतरण व्हावे यासाठी मी सतत प्रयत्न करीत असतो. आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करून आपला वाटा दिल्यास शकुंतलेची ब्रॉडगेजची वाट गतिमान होईल. या रेल्वेमार्गाच्या विकासासाठी राज्य सरकारचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर निधी द्यावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

 – आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal murtizapur achalpur railway line convert into broad gauge
Show comments