नितीन पखाले

यवतमाळ : अत्यवस्थ करोनाबाधितांवर ‘प्लाझ्मा थेरपी’ प्रभावी ठरत असल्याने राज्यातही ही उपचार पद्धती राबविण्यात येत आहे. मात्र प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाल्याने यात अडथळा येत आहे. या अनुषंगाने करोनावर यशस्वी मात करणाऱ्या दोन व्यक्तींनी पुढाकार घेत येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास रक्तद्रव (प्लाझ्मा) दान केले.

राज्यात २९ जूनला सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात या उपचाराच्या वैद्यकीय चाचणीचा प्रारंभ केला. त्याच धर्तीवर येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘प्लाझ्मा फेरेसिस युनिट’ अधिष्ठाता डॉ.आर.पी. सिंग, करोना समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापण्यात आले. करोनावर मात करणाऱ्या व्यक्तींना रक्तद्रव दान करण्याचे आवाहन करण्यात आले. याच विचाराने प्रेरित होऊन महागाव येथील पंकज रूणवाल आणि रामेश्वर तुंगर यांनी आपले अमूल्य असे रक्तद्रव आज सोमवारी दान केले. यावेळी वैद्यकीय समाज सेवा अधीक्षक यांच्याद्वारे दोन्ही तरुणांचे समूपदेशन करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून पात्रतेचा अहवाल देण्यात आला. रक्तपेढी विभाग सहयोगी प्राध्यापक डॉ. जाधव व नोडल अधिकारी डॉ. निलीमा लोढा, रक्तपेढी प्रमुख डॉ. जयवंत महादानी, डॉ.विशाल नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तद्रव संकलन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

रूग्णाचे प्राण वाचवण्यास मदत करा!

“करोनावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘अफेरिसिस युनिट’ या उपक्रमामध्ये मी प्लाझ्मादाता म्हणून सहभागी झालो. मी प्लाझ्मा दान केल्याने गंभीर स्वरूपाच्या रुग्णाचे प्राण वाचवण्यास मदत होईल. करोना संसर्गानंतर मी ज्या परिस्थितीतून गेलो, ती इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी प्लाझ्मा दान केले. उपचारानंतर बरे झालेल्या सर्व करोनासंक्रमित रुग्णांनीसुध्दा स्वेच्छेने प्लाझ्मा दान करावा व शासनास रक्तद्रव उपचार चाचणी मध्ये सहकार्य करावे”, असे आवाहन आज प्लाझ्मा दान करणाऱ्या पंकज रूणवाल यांनी केले.