यवतमाळ : विदर्भातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यावर बसलेला ‘मागास जिल्हा’ हा शिक्का पुसला जात असल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून दिसून येते. शिक्षण क्षेत्र, छोटे उद्योग, रोजगार या क्षेत्रात प्रगती करीत आहे. कुपोषणात झालेली घट जिल्ह्याची स्थिती बदलत असल्याचे सुचिन्ह मानले जाते.

कृषी आणि खनिजाच्या दृष्टीने महत्त्वाचा यवतमाळ जिल्हा १३ हजार ५८२ चौरस किमी क्षेत्रात पसरलाय. सात उपविभाग, १६ तालुके, १० नगर परिषदा, सात नगर पंचायती आणि एक हजार २०१ ग्रामपंचायती असा विस्तार आहे.

दरडोई उत्पन्नात वाढ

जिल्ह्याचे क्षेत्रवार उत्पन्न चालू किमतीनुसार ४६ हजार ९२४ कोटी रुपये असून, त्यात मागील वर्षीच्या तुलनेत यात ९.८ टक्के वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील निव्वळ दरडोई उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे. २०२३-२४ या वर्षात जिल्ह्याचे निव्वळ दरडोई उत्पन्न एक लाख ३७ हजार ६१ रुपये इतके आहे. राज्याच्या उत्पन्नात जिल्ह्याचा हिस्सा १.३ टक्के आहे. यावर्षी कृषी क्षेत्रात जिल्ह्याची पत घसरली आहे. ओलिताखालील क्षेत्राची एकूण क्षेत्रफळाशी टक्केवारी २४.७ इतकी आहे. गेल्यावर्षी ती २६.५ टक्के होती. निव्वळ सिंचन क्षेत्रात गेल्या १० वर्षांत मोठी घट झाली आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ ची निर्मिती आणि नव्याने होत असलेल्या नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया यामुळे विकासाला गती मिळत आहे.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी जिल्ह्यात भरारी घेतल्याचे चित्र आहे. २०२०-२१ मध्ये असे दोन हजार ७३० उद्योग जिल्ह्यात होते. २०२३-२४ मध्ये ही संख्या नऊ हजार ४९९ इतकी झाली. यातून ६१ हजार २६६ रोजगार उपलब्ध झाले असून ५६२८७.४५ लक्ष रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

खनिज संपत्तीने आर्थिक पाठबळ

खनिज संपत्ती हा जिल्ह्याच्या आर्थिक पाठबळाचा मुख्य स्राोत झाला आहे. प्रामुख्याने वणी, झरी जामणी, मारेगाव या तालुक्यांमध्ये कोळसा, चुनखडी या उद्याोगांना चालना मिळाली आहे.

ग्रामीण भागात शाळांच्या संख्येत घट

जिल्ह्यात दर दोन किमीमागे उपलब्ध दहावीपर्यंतच्या शाळांच्या संख्येत सहा वर्षांत मोठी वाढ झाली असली तरी ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये झालेली घट चिंतेचा विषय आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणात मात्र जिल्हा पुढे जात आहे. गेल्यावर्षी या शाळांची संख्या ७८२ इतकी होती; यावर्षी ती ८०१ झाली असून यात १९ ने वाढ झाली आहे.

पर्यटनातून रोजगार निर्मिती

पर्यटन क्षेत्रातही जिल्हा आघाडी घेत आहे. पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने येथे महाराष्ट्रासह देशातील विविध भागातून पर्यटक येतात.

यवतमाळ हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात विविध योजनांचा निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. त्यातून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागत आहे. नियोजन समितीचा निधी ग्रामीण भागाच्या विकासात भर घालत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा निर्देशांक वधारला. माध्यमिक शिक्षणासाठी दर दोन किमीमागे शाळा उपलब्ध असल्याने विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी झाले. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्याोगांसह महिला बचत गटांच्या उद्याोगांनी छोटे छोटे स्टार्टअप सुरू केल्याने औद्याोगिक विकासासोबतच दरडोई उत्पन्नात वाढ झाली, हे सर्व यंत्रणांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे.

अनिल खंडागळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, यवतमाळ