बालविवाह कायद्याबाबत केलेल्या जनजागृतीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील दोन बालविवाह रोखण्यात यश आले आहे. बाल संरक्षण कक्षामार्फत ही कारवाई करण्यात आली.

जिल्हा बाल संरक्षण कक्षाला चाईल्ड लाईनमार्फत नेर तालुक्यातील फत्तापूर गावात दोन बाल विवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. यापैकी एक विवाह १२ जून व दुसरा १६ जुनला होणार होता. ही माहिती तालुकास्तरीय यंत्रणेला देण्यात आली. तालुकास्तरीय यंत्रणेने प्रत्यक्ष फत्तापूर गावात भेट दिली. सर्वांनी संबधित कुटुंबांना दोन्ही मुली १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या असल्याने त्यांचा नियोजित होणारा विवाह बेकायदेशीर असल्याचे सांगितले.

यावेळी संबंधितांना बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह कायद्याबाबत माहिती सांगून त्यामध्ये नमूद असलेल्या शिक्षेची व कारवाईची देखील माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलींच्या आई-वडिलांनी नियोजित विवाह मुलीने वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच करू, अशी लेखी हमी दिली. ही कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अर्चना इंगोले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.