यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात करोनावर उपचार घेणाऱ्या रूग्णांना मुदतबाह्य औषधी देण्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उजेडात आला. याबाबत समाजमाध्यमांवर पुराव्यांसहित माहिती प्रसारित करणाऱ्या तरूण रूग्णास महाविद्यालय प्रशासनाकडून त्रास देण्यात येत असल्याच्या आरोपाने आज वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघाले. अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी यासंदर्भात तातडीने बैठकी घेऊन या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमण्याची घोषणा केली. तसेच, १२ तासांत या समितीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या तरूणाच्या आरोपानंतर प्रशासनाने सोमवारी खोकल्यावरील औषधी बदलून दिली. आज मंगळवारी महाविद्यालयात तीन डॉक्टरांनी हा तरूण उपचार घेत असलेल्या कक्षात प्रवेश करून त्याला अश्लील शिवागाळ करून तेथून हात धरून उचलून अन्य कक्षात नेऊन टाकले, असल्याचे सांगत. या तरूणाने स्वत: याबाबत सकाळी एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला. त्याला श्वास घेण्यास अडचण येत असूनही त्याचे ऑक्सीजन काढण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. सोबतच करोनाच्या औषधी देताना महाविद्याल प्रशासनाकडून आपल्या जीवास धोका असल्याचे त्याने म्हटले आहे. या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज बघून दोषींवर कारवाई करावी. तसेच आपल्या जीवास काही झाल्यास जिल्हाधिकारी, अधिष्ठाता व करोना समन्वयक जबाबदार असतील असे त्याने म्हटले आहे. त्यामुळे येथे उपचार घेण्यास त्याने नकार दिला. कदाचित हा आपला अखेरचा व्हिडीओ असू शकतो, असेही त्याने म्हटले आहे.

या व्हिडीओनंतर जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय, सामाजिक पातळीवर त्याची दखल घेण्यात आली. हा तरूण रूग्ण मुक्त पत्रकार असल्याने त्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून महाविद्यालयातील अनागोंदीवर समाजमाध्यमांतून प्रकाश टाकला. त्यामुळे पत्रकार संघटनाही त्याच्या मदतीसाठी सरसावल्या. अनेकांनी याबाबत थेट मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, खासदार, पालकमंत्री, अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आदींकडे तक्रार नोंदविली.

अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह विलगीकरण कक्षात प्रत्यक्ष भेट देऊन रूग्णांची विचारपूस केली. खासदार भावना गवळी यांनी तातडीने वैद्यकीय विभागाच्या प्रधान सचिवांशी याबाबत चर्चा करून कावाईची मागणी केली. रूग्णांनी असुविधा समाजासमोर मांडली म्हणून त्याला त्रास दिला जात असेल तर ही गंभीर बाब आहे, असे खासदार गवळी म्हणाल्या. शिवाय ज्या रूग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचे आहेत, त्यांना तशी परवानगी देण्यात यावी आणि जिल्ह्यात यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड या शहरांत काही खासगी रुग्णालये प्रशासनाने अधिग्रहित करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे गवळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यापर्यंतसुद्धा हा विषय पोहचविण्यात आल्याची माहिती, आमदार डॉ. वझाहत मिर्झा यांनी दिली. दरम्यान श्रमिक पत्रकार संघानेही याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष संदीप खडेकर यांनी दिली. आज दिवसभर या रूग्णाच्या प्रकृतीबाबत व त्याने केलेल्या धाडसाबाबत जिल्ह्यात सर्वदूर चर्चा होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal that video of corona patient stirred the medical field msr
Show comments