यवतमाळमध्ये गुरूवारी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावल्याने, बळीराजासह नागरिकही सुखावले आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात २९.०१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले जाणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हा आपत्ती निवारण विभागासही दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीपासून पावसाचा जोर कायम असल्याने आज अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती.
जून महिन्यात तुरळक पाऊस पडला. त्यामुळे पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीस तोंड द्यावे लागले. अनेकांनी जुलैतील पावसानंतर पेरणी केल्याने त्यांचे साधले.
नियोजित पाणी पातळीपेक्षा अधिक वाढ –
दरम्यान, संततधार पाऊस सुरू असल्याने बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाच्या जलाशयातील पाणी पातळी २६६.१० मी. झाली आहे तर प्रकल्पात जिवंत पाणीसाठी ८३.३६ दलघमी झाला आहे. धरणात नियोजित पाणी पातळीपेक्षा अधिक वाढ होत असल्याने, सुरक्षेच्या दृष्टीने धरणाचे दोन वक्राकार दरवाजे २५ सेंमीने उघडण्याचा निर्णय बेंबळा प्रकल्प विभागाने घेतला आहे. हे दोन दरवाजे शनिवार ९ जुलै रोजी दुपारी १ वाजता उघडण्यात येणार आहे, असे कार्यकारी अभियंता स.शि. मुन्नोंळी यांनी कळविले आहे. पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.