देवेश गोंडाणे
पाच वर्षांपासून एमपीएससीची तयारी..चारवेळा मुलाखतीपर्यंत पोहोचूनही आलेलं अपयश… अनेकदा नैराश्यही आलं.. पण, अपयशाला घाबरून खचेल तो स्पर्धा परीक्षार्थी कसला? यशस्वी होण्याचा ध्यास उराशी बाळगून प्रत्येक परीक्षेत येत गेलेल्या अपयशाला यशाची पायरी समजून नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालात यवतमाळच्या निखिल दिलीप वाघ याची सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदी निवड झाली.
निखिलची परिस्थिती लहानपणापासूनच अत्यंत हलाखीची होती. वडील पूर्वी सायकलवर गॅस सिलेंडर विकायचे. त्यानंतर त्यांनी ऑटो रिक्षा चालवत घराचा गाडा हाकला. अशा अत्यंत बिकट परिस्थितीतून त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलीला उत्तम दर्जाचे शिक्षण देत सरकारी नोकरीपर्यंत पोहोचवले. त्यानंतर दुसरी मुलगीही शासकीय सेवेत गेली. आता निखिलचीही प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली आहे. यात निखिलच्या मोठ्या बहिणीच्या पतीनेही बरीच मदत केली.
निखिलने प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागातील शाळेतूनच घेतले. त्यानंतर २०१७ पासून त्याने एमपीएससीची तयारी सुरू केली. पाच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर चार मुलाखतींमध्ये अपयशी होऊनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. याआधीच्या परीक्षांमध्ये कधी एक तर कधी दोन गुणांनी हुलकावणी देऊनही निखिलने हार मानली नाही. कुठल्याही महागड्या शिकवणी वर्गांच्या मोहात न पडता निखिलने यवतमाळ येथे अभ्यास करून हे यश मिळवले.
निखिलने त्याच्या यशाचे श्रेय आई-वडिलांसोबतच त्याच्या दोन बहिणी, त्यांचे पती, शिक्षक आणि मित्रांना दिले. निखिलच्या या यशात वित्त व लेखा अधिकारी डॉ. विशाल भेदूरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे तो सांगतो. आता जाहीर झालेल्या राज्यसेवेच्या निकालामध्ये उत्तीर्ण झालेल्या पंधरा ते सोळा विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करून डॉ. विशाल भेदरकर यांनी यशाच्या शिखरापर्यंत पोहोण्यास मदत केली आहे.