Year Ender : २०२४ हे वर्ष महाराष्ट्रासाठी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग देणारं वर्ष ठरलं. मे महिन्यात पार पडलेली लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात पार पडलेली विधानसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकांमध्ये जमीन-आस्मानाचा फरक होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकल्या. त्यामुळे महायुतीचा आत्मविश्वास धुळीला मिळाल्याचं चिन्ह निर्माण झालं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३२ जागा जिंकल्या आणि या कालावधीत तसंच त्यानंतर काही राजकीय नाट्यं पाहण्यास मिळाली. त्यावर एक नजर टाकुयात.
लोकसभा निवडणुकीतलं राजकीय नाट्य
लोकसभा निवडणुकीतलं सर्वात मोठं राजकीय नाट्य घडलं ते बारामतीत. अजित पवारांनी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी फूट पाहण्यास मिळाली. त्यानंतर पवार विरुद्ध पवार या राजकीय नाट्याचा पहिला अंक रंगला तो लोकसभा निवडणुकीत. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार असा सामना रंगला. तरीही प्रत्यक्षात ही लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होती. या लढाईत मैदान मारलं ते शरद पवारांनी. विधानसभा निवडणुकीत वेगळं चित्र दिसलं. विधानसभेत महाविकास आघाडीने युगेंद्र पवारांना तिकिट दिलं होतं. मात्र अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत बारामतीची जागा राखली. अशा रितीने राजकीय नाट्याचा दुसरा अंक संपला. आता चर्चा सुरु झाल्या आहेत त्या दोन्ही पवार एकत्र येण्याच्या. मात्र २०२४ मध्ये घडलेलं हे नाट्य महाराष्ट्र विसरणार नाही.
दुसरं राजकीय नाट्य उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश महाराष्ट्रात मिळालं. त्यानंतर महाविकास आघाडीने त्यांचीच सत्ता येणार असे दावे केले होते. उद्धव ठाकरेंनी तर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा अशीही मागणी केली होती. एवढंच नाही तर त्यांचं एक वाक्यही चांगलंच गाजलं एक तर तू राहशील किंवा मी राहिन. देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ते हे वाक्य म्हणाले होते. ज्यानंतर महाराष्ट्रात काय घडलं ते सगळ्यांनी पाहिलं. भाजपासह महायुतीकडे प्रचंड असं बहुमत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना उद्धव ठाकरेंच्या आव्हानाबाबत विचारलं असता, राजकीय दृष्ट्या कुणीही कधीही संपत नसतं. जोपर्यंत लोकांना वाटतं आहे आपण सगळेच राजकारणात असणार आहोत असं संयत उत्तर दिलं होतं. मात्र विधानसभा निवडणूक ही चुरशीची झाली असली तरीही निकालानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं राजकीय नाट्य कायम राहिल्याचं पाहण्यास मिळालं. तसंच उद्धव ठाकरेंनी जी सदिच्छा भेट घेतली त्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.