कर्नाटकातील पराभवानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयात शुकशुकाट असून एकही पदाधिकारी पराभवावर प्रतिक्रिया देण्यास तयार नव्हता. संघाचे कट्टर स्वयंसेवक असलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. ए. येडियुरप्पा संघ मुख्यालयाला नेहमी भेट द्यायचे. त्यांच्या कार्यकाळात कर्नाटकातील भाजप सरकारातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजत असताना त्यांनी नागपूर दौरे करून संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपुढे अनेकदा त्यांची बाजू मांडलेली होती. कधीकाळी संघाचा ‘ब्लू बॉय’ असलेल्या येडियुरप्पा यांनीच भाजपच्या विजयाच्या मार्गात खोडा घातल्याने संघ वर्तुळ अस्वस्थ आहे. येडियुरप्पा यांनीच खलनायकाची भूमिका बजावल्याने भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उल्हासाचे वातावरण असलेल्या संघ मुख्यालय आणि रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती परिसरात बुधवारी दिवसभर अक्षरश: स्मशानशांतता पसरलेली दिसली.
काँग्रेसने भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांना एकाएकी पिछाडीवर टाकून कर्नाटकात सत्ता मिळविली आहे. येडियुरप्पांच्या कर्नाटक जनता पक्षाच्या उमेदवारांमुळे भाजपच्या मतांचे मोठय़ा प्रमाणात विभाजन होऊन पक्षाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करण्याची वेळ आली.
येडियुरप्पा मूळ संघ स्वयंसेवक असून सात वर्षांपूर्वी कर्नाटकात त्यांचे वर्चस्व होते. संघाचाही येडियुरप्पांना भरघोस पाठिंबा होता. परंतु, गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून येडियुरप्पांना पायउतार व्हावे लागले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना पदावरून दूर करण्याचे आदेश दिले जात असतील तर तोच निकष गडकरी यांनाही का लावण्यात येऊ नये, अशी भूमिका येडियुरप्पांनी घेतली होती. तरीही येडियुरप्पांना हटविण्याच्या निर्णयावर गडकरी कायम राहिले होते. याचे शल्य उराशी बाळगणाऱ्या येडियुरप्पांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकविला आहे. त्यांच्या पक्षाला राज्यात चवथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असले तरी भाजपच्या उमेदवारांना तोंडघशी पाडण्यात निर्णायक भूमिका त्यांनी बजावल्याचे स्पष्ट झाले आहे.
गडकरी यांनी कर्नाटकच्या निकालावर मौन बाळगले आहे. मात्र, फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया व्यक्त करताना सत्ता पणाला लागली तरी हरकत नाही; परंतु भ्रष्टाचार करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालणार नसल्याचे स्पष्ट करून गडकरी यांच्या भूमिकेचे एक प्रकारे समर्थनच केले आहे. कर्नाटकातील निवडणूक निकाल भाजपसाठी अत्यंत वाईट बातमी घेऊन आले असले तरी यातून पक्षाचे नेते निश्चितच धडा घेतील, असे फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर भाजप आणि काँग्रेसच्या भूमिकेत फरक आहे, कारण कायदामंत्री अश्वनीकुमार आणि रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत काँग्रेस जनतेची दिशाभूल करीत असून त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.
संघाचे माजी अखिल भारतीय बौद्धिक विभागप्रमुख मा. गो. वैद्य यांची एकमेव प्रतिक्रिया अत्यंत बोलकी असून भ्रष्टाचाराची बजबजपुरी आणि अंतर्गत लाथाळ्यांमुळे कर्नाटकी जनतेने भाजपला धडा शिकविल्याचा घरचा अहेर त्यांनी केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर मतदानोत्तर सर्वेक्षणातून भाजप सत्तेबाहेर राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु प्रत्यक्षातील निकाल त्यापेक्षाही धक्कादायक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा