राज्याच्या राजकारणात गेल्या दोन वर्षांपासून हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर बरोबर एक वर्षांनी राष्ट्रवादीत बंडखोरी झाली. ही दोन्ही प्रकरणे सध्या अनुक्रमे सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगात प्रलंबित आहेत. या दोन्ही पक्षांच्या बंडखोरीत ज्या नेत्यांचा सहभाग होता, त्या नेत्यांची विधाने आजही महत्त्वाची ठरतात. राष्ट्रवादीत बंडखोरी झाली तेव्हा छगन भुजबळ शरद पवारांसह होते. नेमकं काय झालंय हे पाहून येतो असं सांगून गेलेल्या छगन भुजबळांनी थेट मंत्रिपदाचीच शपथ घेतली. त्यावेळी नक्की काय घडलं होतं? याचा खुलासा छगन भुजबळांनी केला आहे. टीव्ही ९ मराठीने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. सात आमदारांना घेऊन अजित पवार सत्तेत सामील झाले. एवढंच नव्हे तर, शिंदे-फडणवीस सरकारने अजित पवारांसह सातही आमदारांना मंत्रीपदेही दिली. यामध्ये छगन भुजबळ आहेत. छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्यात आलं. परंतु, अजित पवारांनी राष्ट्रवादीत फुट पाडली त्या सकाळी छगन भुजबळांना शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी खोटं बोलावं लागलं होतं.

हेही वाचा >> “शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस सावध झाले आणि…”, छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट

“तिकडे काय झालंय हे पाहून येतो असं सांगून छगन भुजबळ गेले आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली”, असं शरद पवार म्हणाले होते. याबाबत छगन भुजबळांना विचारलं असता ते म्हणाले की, “साहेब म्हणतात ते खरं आहे. त्या दिवशी ठरलं की तिथे जमायचं. त्यानुसार, अजितदादांच्या घरी जमायला सुरुवात झाली. मला पहिल्यांदा सुप्रियाताईंचा फोन आला, मी त्यांच्याशी खोटं बोललो. मी मुलांबरोबर लोणावळ्याला आलो आहे, पाऊस खूप आहे, असं त्यांना सांगितलं. अजित दादांना प्रांताध्यक्ष करण्यासाठी सगळे जमले आहेत, असा सगळ्यांचा असा भ्रम झाला. पण कशासाठी जमले आहेत, कोणालाही माहित नव्हतं. फक्त आम्हाला माहीत होतं. एक दीड महिना चर्चा होऊन सुद्धा कोणालाही माहीत नव्हतं.”

“सुप्रिया ताईंना मी म्हणालो की मी जाऊन पाहतो. सुप्रिया ताई म्हणाल्या तुम्ही नका येऊ. पाच मिनिटांनी लगेच साहेबांचा फोन आला. जे सुप्रिया ताईंना सांगितलं तेच साहेबांना सांगितलं. अध्यक्ष पदाचं नंतर ठरवायचं आहे ना मग आता कशाला गोळा झाले आहेत? असं पवारांनी मला विचारं. मी म्हटंल मी जाऊन बघतो. मी तेव्हा घरीच होतो, पण लोणावळ्यात आहे असं सांगितलं”, असं भुजबळ म्हणाले.

“एक गोष्ट करायची ठरलेलं असताना मी त्यांना सांगू शकत नव्हतो. साडे अकराच्या सुमारास मी देवगिरी येथे गेलो. तिथं सुप्रियाताई भेटल्या. मग थोड्यावेळाने ताई पुन्हा आल्या आणि म्हणाल्या की भुजबळसाहेब ते म्हणायत की भाजपात सामील होतायत. तुम्ही आलात तर ठीक नाही तर आम्ही तुमच्याशिवाय जाणार म्हणतायत”, अशी आठवणही भुजबळांनी सांगितली.

“त्यावेळेलाही ताईंना असं वाटलेलं सहा वाजता शपथविधी आहे. परंतु, सहाची वेळ ठरलीच नव्हती. अचानक सगळे गाडीतून बाहेर पडलो आणि राजभवनला गेलो. सगळे देवगिरीला होते. सगळ्या गाड्या एका पाठोपाठ एक निघाल्या. गाड्या निघाल्यानंतर त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी आमच्या गाड्यांमागे कोणालातरी पाठवलं असेल. आम्ही राजभवनात गेलो तेव्हा एक सरकारी कॅमेरा होता. बाकी कोणी नव्हतं”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yes i lied to pawar and supriya sule that day confesses chhagan bhujbal about that incident sgk