मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच आपल्या गटातील काही आमदार, खासदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांसमवेत अयोध्येला जाऊन आले. या दौऱ्यात भाजपासह शिंदे गटाच्या नेत्यांनी हजेरी लावली असली तरी अनेक आमदार आणि खासदार अयोध्या दौऱ्यावर गेले नाहीत. संबंधित नेत्यांनी विविध कारणं देत अयोध्या दौरा टाळला आहे. यावरून “सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या गटात अस्वस्थता आहे” असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.
राऊतांच्या विधानानंतर शिंदे गटाच्या विविध नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाऊन आमच्यात नाराजी नाही, असं सांगितलं. दरम्यान, प्रहार संघटनेचे नेते आणि शिंदे गटाला पाठिंबा दिलेले आमदार बच्चू कडू यांनी संजय राऊतांच्या विधानाला दुजोरा दिला आहे. “आमच्या गटात अस्वस्थता आहे. मात्र, सरकारमधून बंडखोरी करण्याइतकी अस्वस्थता आमच्यात नाही, ” असं विधान बच्चू कडू यांनी केलं. ते “टीव्ही ९ मराठी”शी बोलत होते.
हेही वाचा- अदाणींच्या कंपनीत २० हजार कोटींची गुंतवणूक कुणी केली? राहुल गांधींच्या आरोपांवर अदाणी समूहाचा खुलासा
संजय राऊतांच्या विधानाबद्दल विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “आमच्या गटात अस्वस्थता आहे, इथंपर्यंत ठीक आहे. पण ती अस्वस्थता बंडखोरी करण्याएवढी नाही. घरात अशा गोष्टी घडत असतात. आमच्यातही कधी नाराजीचा सूर येतो, पण कालांतराने जातो. आमच्यातील नाराजीचा सूर सरकारमधून बंडखोरी करून बाहेर पडण्यापर्यंतचा नाही.”
“सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात एकमेकांवर नाराजी आहे. कधी देवेंद्र फडणवीसांची एखाद्या गोष्टीवरून एकनाथ शिंदेंवर नाराजी असू शकते. तर कधी मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांवर नाराजी असू शकते. एखाद्या गोष्टीबद्दल कमी-अधिक प्रमाणात एकमेंकांबद्दल नाराजी असू शकते. पण याचा अर्थ असा नाही होत की, ‘हम सरकार तोडकर बहार निकलेंगे’,” अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारलं असता बच्चू कडू पुढे म्हणाले, “आमच्या सरकारचा कार्यकाळ सात ते आठ महिने उरला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार करून नाराजी ओढावून घेण्याची मानसिकता सरकारची नाही. म्हणून मला वाटतं, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यापेक्षा ‘जैसे थे’ स्थितीत सरकार चालवणं योग्य आहे. सध्या अडचण पालकमंत्र्यांची आहे. एका जिल्ह्याला एक पालकमंत्री असेल तर त्या जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावायला सोपं जातं. पण एकाच व्यक्तीकडे ८-९ जिल्हे असल्याने लोकांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. हे मात्र खरं आहे.”