लांजा तालुक्यातील खानवली येथील नरेश तेंडुलकर यांच्याकडून पैसे घेतल्याची कबुली शासकीय रुग्णालयातील डॉ. मधुकर शिंदे व वाडीलिंबू प्रा. आ. केंद्राचे डॉ. एन. एम. महामुनी यांनी दिल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान बालकाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. डी. नारोळे यांनी दिली.
खानवली (ता. लांजा) येथील निशा नरेश तेंडुलकर या महिलेला शनिवारी (१७ नोव्हेंबर) वाडीलिंबू प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. मात्र मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तेथील डॉ. महामुनी यांनी अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. ‘जननी सुरक्षा’ योजनेंतर्गत गर्भवतीला शासनाच्या रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलवून तसेच प्रसूतीनंतर घरी सोडायचे असते. मात्र शासनाच्या या योजनेची माहिती नसलेल्या तेंडुलकर यांना बनवले. वाडीिलबू आरोग्य केंद्रातून दिलेल्या रुग्णवाहिकेसाठी ५०० रुपये भाडे द्यावे लागेल, असे डॉक्टरने तेंडुलकर यांना सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले.
दरम्यान त्याच दिवशी निशा तेंडुलकर यांना वाडीलिंबू आरोग्य केंद्रातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी डॉ. मधुकर शिंदे यांनी गर्भवतीची प्रकृती गंभीर असून, त्यांना कोल्हापूरला हलवावे लागेल असे नरेश तेंडुलकर यांना सांगितले. त्या वेळी ‘चहा पाण्याची सोय’ म्हणून डॉक्टरांच्या हातात ५०० रुपये टेकवले. तेव्हा प्रसूती नॉर्मल होईल यासाठी एक हजार रुपये द्यावे लागतील, असे डॉक्टरांनी सांगितल्याचे तेंडुलकर म्हणाले. त्याच दिवशी शनिवारी (१७ नोव्हेंबर) सायंकाळी निशा यांची प्रसूती झाली. मात्र डॉक्टरांनी अवघ्या बारा तासांतच त्यांना डिस्चार्ज दिला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे रविवारी सर्वत्र बंद असून रुग्णवाहिका मिळणार नसल्याचे या विभागातील परिचारिकांनी सांगितले. तेव्हा मी आणि आईने निशा यांना आणखी दोन दिवस रुग्णालयात ठेवून घ्या, अशी विनंती केली. मात्र त्यांनी नकार दिला. अखेर नाइलाजास्तव आम्ही बाळाला घेऊन एस. टी. बसने ४० किमीचा प्रवास केला. त्याचा आमच्या बाळाला त्रास झाला. ते काळेनिळे पडू लागल्याने आम्ही त्याला घेऊन पुन्हा जिल्हा रुग्णालयात आलो आणि गुरुवारी (२२ नोव्हेंबर) त्या बाळाचा मृत्यू झाला, असे नरेश तेंडुलकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. डी. नारोळे व बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांना सांगितले.
या दुर्घटनेमुळे अक्षरश: कोलमडून गेलेल्या तेंडुलकर यांनी काही सहकाऱ्यांसमवेत जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात ठिय्या दिला आणि डॉ. मधुकर शिंदे यांना समोर हजर करा, अशी मागणी केली. मात्र हे डॉक्टर महाशय आलेच नाहीत. अखेर सदर डॉक्टरवर कारवाईचे लेखी आदेश दिल्याने तेंडुलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान बाळाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉ. शिंदे व डॉ. महामुनी या दोघांनी आपण तेंडुलकर यांच्याकडून पैसे घेतल्याची कबुली दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नारोळे यांनी दिले आहेत.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा