जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत कालपर्यंत एकमेकांचे सहकारी होते, ते आता निवडणूक मदानात प्रतिस्पर्धी बनले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपाने प्रचारात रंगत आणली आहे.
हिंगोली मतदारसंघात १९ उमेदवार मदानात असले, तरी प्रामुख्याने चौरंगी सामना होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीमुळे १५ वर्षे एकमेकांचे सहकारी असलेले नेते आता मात्र प्रतिस्पर्धी झाले आहेत. काँग्रेसचे आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे दिलीप चव्हाण, तर २५ वर्षे भाजप-शिवसेना युतीत एकमेकांचे सहकारी असलेले भाजपचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांच्याविरुद्ध सेनेचे दिनकर देशमुख मैदानात आहेत. माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर व भाऊ पाटील गोरेगावकर गेल्या १९ वर्षांपासून एकमेकांविरुद्ध मदानात उतरत होते. या वेळी प्रथमच साहेबराव गोरेगावकर यांच्या कुटुंबातील कोणी उमेदवार नाही.
वसमत मतदारसंघात १२ उमेदवार आहेत.
राष्ट्रवादीतर्फे लोकसभा लढविण्याची तयारी करणारे अॅड. शिवाजीराव जाधव उमेदवारी न मिळाल्याने विधानसभेच्या तोंडावर माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासह सेनेकडून उमेदवारीच्या प्रयत्नात होते. वानखेडे आता भाजपमध्ये आहेत. अॅड. जाधव यांनी सेना जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत घेतलेल्या मेळाव्यादरम्यान झालेली हाणामारी जिल्हाभर गाजली. उमेदवारी मिळविण्यात डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी बाजी मारली. त्यामुळे अॅड. जाधव यांनी आधी काँग्रेस व नंतर भाजपकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले. भाजपने त्यांना उमेदवारी दिली. दांडेगावकर, जाधव व मुंदडा यांच्यात येथे तिरंगी लढत आहे. अॅड. जाधव यांचे वडील मुंजाजीराव जाधव १९८५ला काँग्रेसकडून वसमतमधून निवडून आले होते. या मतदारसंघात दोन जयप्रकाश १९९५पासून एकमेकांसमोर मदानात उतरत आहेत. ही पाचवी लढत त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.
कळमनुरीत १२ उमेदवार आहेत. लोकसभेत वानखेडे यांच्या धनुष्यबाणासाठी दुचाकीची भव्य रॅली जिल्हाभर फिरवून प्रचारात झोकून दिलेले राष्ट्रवादीचे शिवाजी माने, राष्ट्रवादीतून सेनेत जाऊन धनुष्यबाण घेऊन मैदानात उतरलेल्या गजाननराव घुगे यांच्याविरोधात मदानात आहेत. डॉ. संतोष टारफे काँग्रेसची उमेदवारी करीत आहेत. भारिप-बहुजन महासंघाला अखेरच्या क्षणी सोडचिठ्ठी देत रासपकडून उतरलेले अॅड. माधवराव नाईक गेल्या अनेक वर्षांपासून या ना त्या पक्षाच्या चिन्हावर मदानात असतात. या मतदारसंघात हटकर, धनगर समाजाचे मतदान लक्षणीय असल्याने महासंघाला सोडचिठ्ठी देत त्यांनी रासपची वाट धरली. यापूर्वी दोन वेळा महासंघात धरसोड केली. मूळचे शेकापचे असलेल्या अॅड. नाईक यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप-बहुजन महासंघ, भाजप, परत महासंघ व आता रासप असा प्रवास करीत आखाडय़ात उतरले आहेत. बसप व मनसेचे उमेदवार मदानात असले, तरी चौरंगी लढतीची शक्यता आहे. येथे शिवाजीराव माने १९९५ला सेनेकडून उमेदवार होते. कम्युनिस्ट पक्षाचे विठ्ठलराव नाईक यांनी त्यांना पराभूत केले होते.
काल सहकारी आज प्रतिस्पर्धी!
जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत कालपर्यंत एकमेकांचे सहकारी होते, ते आता निवडणूक मदानात प्रतिस्पर्धी बनले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपाने प्रचारात रंगत आणली आहे.
First published on: 03-10-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yesterday friend today competitor