गेल्या वीस वर्षांपासून चळवळीत सक्रिय असलेला व गेल्या सात वर्षांपासून दक्षिण गडचिरोली विभागाचे नेतृत्त्व करणारा जहाल नक्षलवादी शेखर अण्णा व त्याची पत्नी विजयाक्का यांनी शुक्रवारी शेजारच्या आंध्र प्रदेशातील खम्मम जिल्हय़ात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याने या चळवळीला जबर हादरा बसला आहे. शेखरवर गडचिरोलीत ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.  
 आंध्रमधील करीमनगर जिल्हय़ातील मंथनी तालुक्यातील मच्चुपेठा गावचा राहणारा शेखर पदवीधर झाल्यानंतर या चळवळीत दाखल झाला. प्रारंभी रयतकुली संगमचे काम करणारा शेखर लवकरच या चळवळीच्या नेत्यांच्या नजरेत भरला. नंतर त्याच्यावर तेलंगानामधील आदिलाबाद व करीमनगर या दोन जिल्हय़ातील सशस्त्र चळवळीची जबाबदारी देण्यात आली. सुमारे तेरा वष्रे आंध्रप्रदेशात काम केल्यानंतर शेखरला सात वर्षांपूर्वी दक्षिण गडचिरोलीत पाठवण्यात आले. लवकरच त्याला या विभागाचा सचिव म्हणून बढती देण्यात आली. त्याच्या सोबत त्याची पत्नी विजयाक्का सुध्दा गडचिरोलीत दाखल झाली. शेखरच्या नेतृत्वात गडचिरोलीच्या दक्षिण भागात अनेक मोठय़ा हिंसक कारवाया घडवून आणण्यात आल्या. २००९ मध्ये लाहेरी जवळ सी-६० च्या १७ जवानांना ठार करण्यात शेखरचा मोठा वाटा होता. या हिंसक कारवाया घडवून आणतानाच शेखरने या भागात अनेक गावात चांगले संबंध प्रस्थापित केले होते. गेल्या जानेवारीत भामरागड पंचायत समितीचे सभापती बहादूरशाह आलाम यांच्या हत्येचा निर्णय नर्मदाने घेतल्यानंतर शेखरने त्याला कडाडून विरोध केला होता. तेव्हापासूनच नर्मदा व त्याच्यात मतभेदाला सुरूवात झाली. नंतर शेखरला भामरागड परिसरातून अहेरी भागात पाठवण्यात आले. तरीही नक्षलवाद्यांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या गावकऱ्यांच्या प्रत्येक बैठकीत नर्मदा सोबत शेखर हजर असायचा. गेल्या दोन वर्षांपासून दलम कमांडर असलेल्या त्याच्या पत्नीची प्रकृती साथ देत नव्हती. तिच्यावर योग्य उपचार होत नसल्याने हे दोघेही अस्वस्थ होते. अखेर आज त्यांनी खम्मम पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. शेखरचे मूळ नाव बंधारपू मलय्या आहे तर विजयाक्काचे मूळ नाव गदागोपी बल्लव आहे. आंध्रमध्ये सुरू असलेल्या आत्मसमर्पण योजनेंतर्गत शेखरला ११ लाख रूपये तर त्याच्या पत्नीला ७ लाख रूपये मिळणार आहेत. शेखरच्या या कृतीमुळे या चळवळीला मोठा हादरा बसला आहे. शेखर हा या चळवळीचा नेता होता व त्याच्यावर ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असावेत असे गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी   सांगितले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा