अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध खासदार शरद पवार असं चित्र पाहायला मिळतंय. या निमित्ताने पवार कुटुंबाचा गड असणाऱ्या बारामती या लोकसभा मतदारसंघाचीही सगळीकडे चर्चा होतेय. या मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यात लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर तसेच पवार कुटुंबावर शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी सविस्तर भाष्य केलंय. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अजित पवारांचं बंड पवार कुटुंबाला आवडलेलं नाही”

युगेंद्र पवार म्हणाले की, कुठल्याही पक्षात, कुटुंबात फूट पडली तर लोकांना ते आवडत नाही. कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मलाही अजित पवार यांचे बंड आवडेलेल नाही. असं काहीतरी होईल, असं मलाही कधाही वाटलं नव्हतं. कुटंबातील जवळपास सर्वच लोकांना हे आवडलेलं नाहीये. असं व्हायला नको होतं.

“आमचा आदर कधीच कमी होणार नाही”

“शरद पवारांनी माझ्या वडिलांना मुंबईत आणलं. त्यांनी माझ्या वडिलांना एक एजन्सी दिली. शरद पवार हे नेहमीच कुटुंबप्रमुख राहतील. त्यांनी त्यांचे बहीण, भाऊ अशा सर्वांचीच काळजी घेतली. आमचीदेखील त्यांनी काळजी घेतली. शरद पवार यांनी त्यांच्या भावंडांना राहायला एक घर दिलं, एक व्यवसाय दिला. त्यामुळे त्यांच्याविषयीचा आमचा आदर कधीच कमी होणार नाही,” असं युगेंद्र पवार म्हणाले.

“बारामती लोकसभा मतदारसंघात फिरायला चालू केलं”

“मी बारामती लोकसभा मतदारसंघात फिरायला चालू केलं आहे. मी परवा हवेलीला गेलो होतो. मी पुढच्या आठवड्यात इंदापूरला जाणार आहे. त्याच्या पुढच्या आठवड्यात मी खडकवासल्याला जाणार आहे. मी दौंड, मुळशीलाही जाणार आहे. कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे की मी त्यांना भेटावं. मला लोकांना भेटायला आवडतं. मी पूर्वीपासूनच सामाजिक कामं करत आलो आहे,” असंही युगेंद्र पवार यांनी सांगितलं.

“बारामतीतून सुप्रिया सुळेच निवडून येणार”

बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी बोलताना, “तुतारी हे निवडणूक चिन्ह आता सगळीकडे पोहोचलं आहे. कारण आज समाजमाध्यमं आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे या पराभूत होतील, असं मला वाटत नाही. मला तर वाटतं की सुप्रिया सुळे या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. सुप्रिया सुळे यांनी खूप कामं केलेली आहेत. सुनेत्रा काकी (अजित पवार यांच्या पत्नी) बारामतीतून उभ्या राहतील, असे मला वाटत नाही. बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार लढत होईल, असे मला वाटत नाही. एक नातू म्हणून मी माझ्या आजोबांच्या (शरद पवार) सोबत आहे. आम्ही सगळे पुरोगामी विचारांचे लोक आहोत. त्यामुळेच आम्ही शरद पवार यांना साथ देणार,” असं युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogendra pawar comment on baramati constituency election supriya sule and sunetra pawar battle prd