योगेंद्र यादव यांचा शेतकऱ्यांशी संवाद; देशातील ५० कोटी जनतेला दुष्काळाचा फटका
दुष्काळी भागातील समस्यांची माहिती मुख्यमंत्री व पंतप्रधानांना देऊ, असे आश्वासन प्रा. योगेंद्र यादव यांनी दिले. नांदेड येथून सुरू झालेल्या संवेदना यात्रेतील कार्यकर्त्यांनी सोमवारी बीड व परभणी जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
अनेक राज्यात पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली, तरी राज्यकर्त्यांना याचे काहीही गांभीर्य नाही, असे मत यादव यांनी या वेळी व्यक्त केले.
अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथे ते बोलत होते. देशाच्या ४० टक्के भागात कोरडा दुष्काळ पडला आहे. सुमारे ५० कोटी जनतेला दुष्काळाने ग्रासले असून २५ कोटी शेतकरी हैराण आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडात कोरडय़ा दुष्काळाचे सर्वाधिक गंभीर सावट आहे. दोन्ही ठिकाणचे दु:ख सारखेच आहे, ते जोडण्यासाठी गांधी जयंतीपासून संवेदना यात्रा सुरू केली असल्याचे यादव यांनी नांदेड येथे सांगितले. दुष्काळाचे हे संकट आफ्रिका किंवा देशाबाहेरील अन्य कुठे नाही तर आपल्याच देशात आहे. अशा वेळी देशवासीयांनी एकत्र येऊन या आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांमागे उभे राहण्याची गरज आहे. आपण एकटे आहोत आणि आपले कोणी नाही, अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होणार नाही, या बाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याचेही यादव म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा