उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला शाब्दीक उत्तर देण्याची गरज नाही. शिवसेनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी आम्ही घेतली असून, ती वाढवतोय. टीकेला उत्तर देण्यापेक्षा तळागाळातील विकासकामं करुन जनतेची मनं जिंकायची, आणि बाळासाहेबांना अभिप्रेत असणारा भगवा झेंडा दापोली मतदारसंघात फडकवत ठेवायचा, हा आमचा उद्देश आहे, असं मत शिवसेना ( शिंदे गट ) आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
संजय कदमांसारखा दहा पट ताकदीचा माणूस मिळाला आहे, असं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलं आहे. त्याबद्दल विचारलं असता योगेश कदम म्हणाले, “सुषमा अंधारेंना कोण ओळखतं. गेल्या सहा महिन्यांत त्या पुढं आल्या आहेत. पण, सुषमा अंधारेंना बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राने व्यासपीठ उपलब्ध करून देणं हेच दुर्दैवी आहे.”
हेही वाचा : “सध्या आम्ही विरोधात पण २०२४ ला सत्ता…” कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला विश्वास
“सुषमा अंधारेंनी बाळासाहेब ठाकरेंचा ७५ वर्षांचा म्हातारा, असा उल्लेख केला आहे. अशा व्यक्तीला तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देता? त्यांना कुठं खेड, रामदास कदम आणि योगेश कदम माहिती आहे. अशा व्यक्तींना प्रतिसाद देणं सुद्धा योग्य वाटत नाही. त्यांना राजकीय गंध अजिबात नाही,” अशी टीका योगेश कदम यांनी सुषमा अंधारेंवर केली आहे.
हेही वाचा : “हा चिपळूनचा लांडगा…”, ‘तात्या विंचू’ म्हणणाऱ्या भास्कर जाधवांना रामदास कदमांचा प्रत्युत्तर
“उद्धव ठाकरेंचे हात बरबटलेले आहेत”
तर, शिवसेना ( शिंदे गट ) नेते रामदास कदम यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. “बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर तुम्ही बेभान झाले आहात. शिवसेना माझी प्रायव्हेट लि. कंपनी आहे, असं वागू लागले. मी म्हणेल तेच होईल. हुकूमशहा प्रवृत्तीसारखे उद्धव ठाकरे वागले. मला बदनाम करण्याचं राजकारण केलं. बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री आणि नेते बाहेर. आम्हालाही बोलता येते. उद्धव ठाकरेंचे हात बरबटलेले आहेत,” अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली.