Minister Yogesh Kadams Allegations On Raj Thackeray’s MNS : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारत आपली सत्ता कायम राखली आहे. यामध्ये भाजपाने सर्वाधिक १३२, शिवसेना (एकनाथ शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) ४१ अशा एकूण २३० जागांवर विजय मिळवला. अशात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री योगेश कदम यांनी, विधानसभा निवडणुकीत मनसेने मते खाल्ल्यामुळे त्यांच्या पक्षाचे दहा उमेदवार पराभूत झाल्याचा दावा केला आहे. आता योगेश कदम यांच्या या दाव्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनसेमुळे आमचे १० उमेदवार पडले…

शिवसेना आणि मनसेबाबत बोलताना मंत्री योगेश कमद म्हणाले, “धनुष्यबाणावर निवडून आलेले ५७ आणि आम्हाला पाठिंबा असलेले ३ अपक्ष असे शिवसेनेचे ६० आमदार आज महाराष्ट्रात आहेत. विधानसभा निवडणुकीत आमचे जवळपास १० आमदार मनसेमुळे पडले आहेत. आपण जर गणित बघितले, आकडेवारी बघितली तर आमचे असे १० उमेदवार आहेत, जे मनसेने जेवढी मते खाल्ली त्यापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले आहे. म्हणून मला वाटते याची पुनरावृत्ती होऊ नेये. महायुती आणखी भक्कम करायची असेल, हिंदुत्त्व आणखी भक्कम करायचे असेल, मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय मिळवून द्यायचा असेल आणि मुंबईमध्ये पुन्हा महायुती निवडून येण्यासाठी राज ठाकरे यांनी सोबत येण्याचा निर्णय घ्यावा, अशी मी त्यांना विनंती करतो.”

विधानसभा निवडणुकीत मनसेची पाटी कोरी

राज्यात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. इतकेच नव्हे तर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनाही या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. २०१९ विजयी झालेले एकमेव आमदार राजू पाटील यांचाही पराभव झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदाच्या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.

एकीकडे राज ठाकरेंनी निवडणुकीच्या आधीच्या मुलाखतींमध्ये सरकार आमच्याच पाठिंब्यावर येणार, असा ठाम विश्वास व्यक्त करत होते. मात्र, विधानसभेचे निकाल मनसेसाठी निराशाजनक राहिले. महाराष्ट्रात १२८ विधानसभा मतदारसंघांमध्ये राज ठाकरेंनी मनसेचे उमेदवार उभे केले होते. पण त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

हे ही वाचा : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका

दुसरीकडे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ८५ जागांवर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यापैकी ५७ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. दरम्यान राज्यातील ३ अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ आता ६० वर पोहचले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogesh kadam minister eknath shinde shivsena mns raj thackeray maharashtra assembly election 2024 aam