Yogesh Kadam On Sanjay Shirsat : गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या सरकारमध्ये नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरु असल्याची चर्चा आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल असं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगितलं जात आहे. असं असतानाच मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (ठाकरे) या दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या संदर्भात एक विधान केलं. त्यांच्या विधानानंतर महायुतीत खळबळ उडाली. यानंतर आता शिवसेना (शिंदे) पक्षाच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मोठं भाष्य केलं. “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत काही महत्त्व नाही”, असं योगेश कदम यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगली आहे.
योगेश कदम काय म्हणाले?
“शिवसेना (शिंदे) पक्षाची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठरवत असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव केला तेव्हा आम्ही सर्व अधिकार मग त्यामध्ये पक्षाचे आणि निर्णयाचे सर्व अधिकार फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दिलेले आहेत. ते अधिकार दुसरे कोणालाही नाहीत. त्यामुळे मंत्री संजय शिरसाट हे काय म्हणतात त्याला महायुतीमध्ये काही महत्व नाही. कारण ते त्यांचं वैयक्तिक मत आहे”, असं योगेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले होते?
शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याच्या संदर्भात मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, “मला वाटतं त्यांनी (उद्धव ठाकरे यांनी) दोन पावलं मागे आलं पाहिजे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि त्यांचं (उद्धव ठाकरे) सुत जमेल असं वाटत नाही. मात्र, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आली तर माझ्या काही मर्यादा आहेत. मी एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जाऊ शकतो. मी त्यांना बोलू शकतो. पण एकनाथ शिंदे यांनी मला प्रतिप्रश्न केला तर मला काही बोलता येणार नाही”, असं संजय शिरसाट यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं होतं.
दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांच्या या विधानानंतर भाजपाच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं की, “संजय शिरसाट यांनी तसे प्रयत्न करत रहावे. मात्र, एकनाथ शिंदे यांचं त्याबाबत मत काय आहे आणि त्यांच्या सर्व आमदारांचं काय मत आहे? याबाबतही विचार करावा. संजय शिरसाट हे मित्र आहेत. पण त्यांचा आता संजय राजाराम राऊत होऊ नये अशी अपेक्षा आहे”, असं म्हणत नितेश राणे यांनी खोचक टीका केली.