उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवाला आज उपस्थिती लावली. यावेळी स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांची योगी आदित्यनाथ यांनी प्रशंसा केली. ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्याचे काम केले, त्याप्रमाणेच श्री गोविंददेव गिरी महाराज आज काम करत आहेत, असे विधान केले. गोविंददेव गिरी महाराज हे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात बोलत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण देऊन अनुष्ठानचे महत्त्व समजावून सांगतिले होते. त्यांच्या विधानवरून बरीच टीका झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधानांशी तुलना करण्याचा हा प्रकार असल्याचे विरोधकांनी म्हटले होते. त्यानंतर आज योगी आदित्यनाथ यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या कार्याची ओळख गोविंददेव गिरी महाराज यांच्या कामाला दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना; गोविंदगिरी महाराज म्हणाले, “श्रीमंत योगी…”

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

आपल्या भाषणात योगी आदित्यनाथ म्हणाले, “समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतभर चेतना निर्माण केली. त्या कालखंडात औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान देत असताना त्यांनी औरंगजेबाला इथे मरण्यासाठी सोडलं. तेव्हापासून आजपर्यंत औरंगजेबाला कुणीही विचारत नाही. ही शौर्य आणि पराक्रमाची धरती आहे, कारण या मातीला पूज्य संतांचे सानिध्य प्राप्त झाले. इथल्या भक्तांनी आपल्या संताना एका उंचीवर नेले आहे. त्यामुळे इथल्या भक्तांमध्ये शक्तीचा संचाल झालेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने आपण त्याचा प्रत्यय घेतला.”

छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी घडवलं? योगींच्या विधानाचा अजित पवार निषेध करणार का? रोहित पवारांचा सवाल

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक आठवण सांगताना म्हटले की, पंतप्रधान मोदी यांच्या आदेशानंतर ते आग्रा येथे एका संग्रहालयाचे काम पाहायला गेले होते. मात्र तिथे गेल्यानंतर त्यांना कळलं की, संग्रहालयाचे नाव मुघल संग्रहालय ठेवण्यात येणार आहे. “यावर मी आक्षेप घेतला. मुघलांचा आणि आपला संबंध नाही. आपला संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे. त्यामुळे त्या संग्रहालयाचे नाव मी छत्रपती शिवाजी महाराज ठेवण्यास भाग पाडले”, अशी आठवण त्यांनी सांगितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये एक डिफेन्स कॉरिडोअरची स्थापना केली आहे, तोही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित केला आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

समर्थ रामदास स्वामी यांच्याप्रमाणेच गोविंददेव गिरी यांचे कार्य

“स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी सनातन वैदिक धर्मासाठी सर्वकाही त्यागले आहे. देश-विदेशात त्यांनी वैदिक शाळांची निर्मिती केली. भगवद्गीतेचा संदेश जनमाणसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे हा देश वेदांचे मार्गदर्शन पुन्हा प्राप्त केले. मध्युगीन काळात समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शन केले होते, ते काम आज गोविंददेव गिरी महाराज यांच्या सानिध्यात होत आहे. त्यांचे ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो”, अशी भावना योगी आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केली.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, मला आळंदीत येण्याची खूप पूर्वीपासूनची इच्छा होती. मी लहानपणी ज्ञानेश्वरीचे वाचन केले होते. तेव्हापासून मला दिव्यविभूतीचे दर्शन घ्यायचे होते. अवघ्या १५ व्या वर्षी ज्ञानेश्वरीचे लिखाण करून ज्यांनी २१ व्या वर्षी समाधी स्वीकारली, त्या ज्ञानेश्वर माऊलींचे आज मला दर्शन घेता आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogi adityanath compared shri govinddev giri maharaj with samarth ramdas swami kvg
Show comments