कराड : पाकिस्तानशी संबंध बिघडतील म्हणून दहशतवादाला पाठीशी घालत काँग्रेस देशहिताच्या आड येत राहिली. फोडा- झोडा अन् राज्य करा हे धोरण असलेल्या काँग्रेसच्या रक्तात ब्रिटिशांचाच डीएनए असून, त्यांना राष्ट्राच्या सन्मान, स्वाभिमानाची फिकीर नसल्याची घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. नव्या भारताशी पाकिस्तान दु:साहस करू शकत नाही कारण त्यांना माहिती आहे, नव्या भारतातील मोदी सरकार कोणाला डिवचत नाही आणि डिवचलं तर, त्याला सोडत नाही, असे ते म्हणाले.
‘महायुती’तर्फे ‘कराड उत्तर’चे भाजप उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ मसूर (ता. कराड) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. उमेदवार मनोज घोरपडे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
योगी आदित्यनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे राष्ट्र, समाज जोडण्याचे काम करत आहे. परंतु, देशात ज्याप्रमाणे इंग्रजांनी लोकांवर अन्याय, अत्याचार केले. त्याप्रमाणे ‘फोडा आणि राज्य करा’ अशी रणनीती काँग्रेसने अवलंबली. काँग्रेसने राष्ट्रासह हिंदू समाज, जात- पात, क्षेत्र, भाषेच्या नावावर फूट पाडण्याचे काम केले, त्या काँग्रेसचा डीएनए ब्रिटिशांचाच असल्याची टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
हेही वाचा >>>“ए आजी तुला बोललो ना…”; राज ठाकरेंनी सांगितला स्वित्झर्लंडमधील भन्नाट किस्सा!
आपल्यात एकी नसल्याने राम मंदिर, काशी विश्वनाथ, मथुरेमध्ये आपल्याला अपमान सोसावा लागला. महाराष्ट्रात स्फूर्तिस्थान असलेल्या शिवरायांच्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमणे झाली. गणपती, रामनवमीच्या मिरवणुकांवर दगडफेक होते. ‘हम बटे थे तो कटे थे’. त्यामुळे ‘हम एक है तो सेफ है’, हे ओळखून संपूर्ण देशाला एकजूट करण्याचे काम तसेच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नवभारत निर्माण करायचा आहे. ‘सबका साथ सबका विकास’ यानुसार सर्व योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवायचा आहे.
हेही वाचा >>>मिरजेत नागरी वस्तीजवळ तिरंदाज पक्षी आढळला; पक्षीप्रेमींकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त
मोदींनी काश्मीरमधील ३७० कलम हटवले, आतंकवाद संपुष्टात आणला. परंतु, काँग्रेसचा जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम आणण्याचा निर्धार असून, तो यशस्वी होऊ देऊ नका. आतंकवाद, नक्षलवाद वाढवणाऱ्या भ्रष्टाचारी काँग्रेसला पुन्हा सत्तास्थान देऊ नका. राम मंदिर उभे राहायला पाचशे वर्षे लागली. काँग्रेसला राम मंदिर करता आले असते. परंतु, त्यांच्या अजेंड्यावर राम मंदिरासह मुलींची सुरक्षा, महिलांचा सन्मान, युवकांसाठी रोजगार, शेतकरी सन्मान हे मुद्दे कधीही नव्हते. त्यामुळे देशात सुरक्षा, समृद्धी आणि सुशासन घडवण्यासाठी महायुती सरकारला साथ देणे गरजेचे आहे. तरी नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी मनोज घोरपडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.
अयोध्येचे निमंत्रण
मनोज घोरपडे आपण विजयाचा गुलाल घेऊन ‘कराड उत्तर’च्या जनतेला अयोध्या दर्शनासाठी रेल्वेने घेऊन या. बाकी सर्व व्यवस्था मी करतो. तसेच प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्याचे निमंत्रणही देतो असे योगी आदित्यनाथ म्हणाले.