अलिबाग- फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून आमदार होता येत नाही. त्यासाठी लोकांमध्ये जावे लागते त्यांचे प्रश्न सोडवावे लागतात. आम्ही सोशल मीडिया वापरत नाही. पण लोकांमध्ये असतो, अशी टीप्पणी माजी आमदार सुभाष पाटील यांनी केली. येत्या निवडणुकीत शेकापचाच आमदार अलिबाग मतदारसंघातून निवडून येईल असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
काही नेते फेसबुकवर रिल्स टाकून आमदार व्हायला निघाले आहेत. पण समाजमाध्यमांवर रील टाकून आमदार होता येणार नाही त्यासाठी मतं मिळवावी लागतील, हे लक्षात घ्यायला हवे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. पण उमेदवारी कोणाला द्यायची हा कार्यकर्त्यांशी बोलून पक्षनेतृत्वाने निर्णय घ्यायचा आहे. शेकाप हा प्रवाहाविरोधात जाऊन काम करणारा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. गेल्या काही निवडणुकीत आम्ही ज्या युत्या आघाड्या केल्या त्यात आम्हाला अपयश आले. पण म्हणून पक्षाचा विचार आणि त्याचा जनाधार संपला असे नाही.
हेही वाचा – सोलापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी
जयंत पाटील यांच्याबद्दल आमच्यात कुठलीही नाराजी नाही. शेतकरी कामगार पक्ष हा कुटुंबाचा पक्ष नाही. हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचा उमेदवार कोण असेल हे कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. शिवसेनेसारखी एकाधिकारशाही आमच्याकडे नाही. त्यामुळे कार्यकर्त्ये ठरवतील आणि ते सांगतील तोच उमेदवार आमच्या पक्षाकडून दिला जाईल. निवडणुका आल्यावर निवडणूक लढवता यावी अशी सगळ्यांची इच्छा असते, चित्रलेखा पाटील या महिला आघाडी प्रमुख आहेत. त्यांनी करोना काळात चांगले काम केले आहे. लोकांना मदत केली आहे. म्हणून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागणे काही गैर नाही. माझ्यासह आस्वाद पाटील, चित्रा पाटील, सवाई पाटील हे देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. लोकशाहीत या प्रक्रिया होत असतात. आजही रायगड जिल्ह्यातील अनेक गावांत मला मानणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे जो निवडून येऊ शकेल असा उमेदवार पक्षाकडून दिला जाईल.
उमेदवारीबाबत आमच्यात वाद आहेत असे नाही. महायुतीकडून भाजपचे दिलीप भोईर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेना उबाठा गटाचे सुरेंद्र म्हात्रे यांनाही निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे युत्या आघाड्याच्या माध्यमातून जेव्हा निवडणूक होते. तेव्हा उमेदवारीसाठी आग्रही असू शकतात. पाच वर्षे आम्ही सत्तेच्या बाहेर आहोत. चाळीस हजारांचे मताधिक्य विरोधकांना आहे. त्यामुळे पक्षाने तिकीट दिले म्हणून निवडून आलो असे होणार नाही. आम्हाला हे मताधिक्य तोडून निवडून यावे लागेल. आजही शेकापला मानणारा मतदारसंघात मोठा वर्ग आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आमचा उमेदवार येथून निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.