कारवर उभं राहून बाळासाहेबांची कॉपी केली म्हणजे बाळासाहेब ठाकरे होता येत नाही असं म्हणत भाजपाने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. गाडीवर उभं राहून जसं बाळासाहेब ठाकरेंनी भाषण केलं होतं त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंचं भाषण आहे अशी चर्चा सोशल रंगली आहे. त्यावर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी हे दोन्ही फोटो ट्विट करत यातला नेमका फरक उलगडला आहे.
केशव उपाध्येंचं ट्विट काय?
गाडीवर उभं राहण्याची कॉपी करून काही होत नसतं. बाळासाहेब ठाकरेंनी दिवसरात्र मेहनत घेतली, कार्यकर्ता जपला, संघटना उभी केली, सत्तेवर शिवसैनिक बसवला. तर कॉपीबहाद्दर कधीही घराच्या बाहेर पडले नाहीत, कार्यकर्त्यांना भेटले नाहीत, उभी संघटना गमावली, विश्वासघाताने स्वतःच सत्तेवर बसले अशी तुलना करणारं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे. एका बाजूला कारच्या बॉनेटवर उभे असलेले बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे असा फोटोही ट्विट केला आहे.
निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला?
निवडणूक आयोगाने शुक्रवारी हा निर्णय दिला आहे की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडे असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हातून पक्ष आणि पक्षाचं चिन्ह निसटलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी धक्का मानला जातो आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन चिन्ह आणि पक्ष चोरणाऱ्या चोरांमुळे आणि त्यांचं कौतुक करणाऱ्यांमुळे काही फरक पडत नाही असं म्हटलं आहे.
आजही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलं आव्हान
“ज्या पद्धतीने आपले शिवसेना हे नाव चोराला दिले. आपला पवित्र धनुष्यबाण हा चोराला दिला. ज्यांनी धनुष्यबाण चोरला ते मर्द असतील तर त्यांनी चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत यावं. मी मशाल घेऊन तुमच्यासमोर उभा राहतो. बघुया काय होतं तर. धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो. रावणाने शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो उताणा पडला होता. तसेच हे चोर आणि चोरबाजाराचे मालक शिवधनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाहीत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना भाजपाने कॉपी बहाद्दर असं म्हटलं आहे.