एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांवर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, आदित्य यांनी एकनाथ शिंदे यांना वरळीत निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावर आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तरं येऊ लागली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
म्हस्के म्हणाले की, “आदित्य ठाकरे राजीनाम्याची भाषा करतात, त्यांना राजीनामा देण्यापासून कोणी रोखलंय. उद्धव ठाकरे आणि आदित्य पिता-पुत्र दोघेच राजीनाम्याची भाषा बोलत असतात आणि केवळ सहानुभूतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात.”
म्हस्के म्हणाले की, “आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहेत, परंतु ते बांद्रा (वांद्रे) मतदार संघात विधानसभेच्या निवडणुकीसाठी का उभे राहिले नाहीत? त्यांनी आधी तिथे निवडणूक लढवावी आणि मग बोलावं. आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिल्यास आम्ही त्यांचं स्वागत करू.”
म्हस्के आदित्य ठाकरे यांना म्हणाले की, “तुमच्याकडे साधे ५ नगरसेवक थांबले नाहीत, कोण आहे तुमच्याकडे? ठाकरे गटाच्या बैठकांना ४०० ते ५०० रुपये देऊन माणसं बोलवावी लागतात. ठाकरे गटाचा केवळ पोरखेळ सुरू आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहेत. त्याच काँग्रेसच्या सचिन अहिर यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलं आणि आमदार केलं.”
हे ही वाचा >> बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण ॲक्शन मोडमध्ये, मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार; म्हणाले, “थोरात पक्ष सोडून…”
…म्हणून नाशिकमधले शिवसैनिक शिंदे गटात येतायत : म्हस्के
म्हस्के म्हणाले की, “नाशिकमधील शिवसेनेच्या मंदिराचा पाया ज्या शिवसैनिकांनी रचला त्याच शिवसैनिकांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. कारण नाशिकमध्ये आता घराणेशाही सुरू आहे. त्यांची शोकांतिका आहे म्हणूनच ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत.”