Ajit Pawar and Devendra Fadnavis in Budget Session 2025 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. विविध क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींचा उल्लेख करताना त्यांनी कृषी क्षेत्रात होत असलेल्या बदलांविषयी माहिती दिली. कृषी क्षेत्रात एआयचा वापर वाढवल्याने उत्पादन वाढणार असल्याचं ते म्हणाले. याबाबत उदाहरण देत असताना त्यांनी उसाच्या उत्पादनाविषयी माहिती दिली. ही माहिती देत असताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मिश्किल संवादही झाला.

“मी विश्वासाने सांगतो AI तंत्रज्ञानच्या काळात कृषी क्षेत्राला मी नवी संजीवनी देईन. त्यातून महाराष्ट्रातील शेतकरी समृद्ध होईल. सभागृहातील शेतकऱ्यांनी पाहिलंय की पूर्वी उसाचं टनेज ६०-७० . होतं पण जयंतराव आता १०० च्या पुढे टनेज गेलं की नाही? आज टनेज वाढल्यानंतर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. १४५ पर्यंत टनेज वाढलं आहे, पण सांगताना १०० सांगितलं. कारण परत म्हणला की हा दिवसा बोलतोय की रात्री? म्हणून म्हटलं १०० च्या पुढे टनेज गेलं”, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहाला देत होते. तेवढ्यात शेजारी बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमचा रात्रीशी संबंध नाही.”

त्यावर अजित पवारही मिश्लिकपणे म्हणाले की, “हे तुम्हाला माहितेय. त्यांना नाही माहीत.” या दोघांच्या या संवादातून सभागृहात एकच हशा पिकला.

…म्हणून योजना बंद कराव्या लागल्या

“या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या काही योजना बंद केल्याचे प्रसार माध्यमही दाखवत होते. सभागृहातही काही सन्माननीय सदस्यांनी याचा उल्लेख केला. मला तुम्हाला सांगायचंय, काही योजना या त्या-त्या वेळी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार सुरू केल्या जातात. सर्वच योजनांचे वेळोवेळी पुनर्विलोकन होत असते. ज्या योजना कालबाह्य ठरतात, त्या बंद कराव्या लागतात”, असं अजित पवार म्हणाले.

“कोविडमध्ये आपण काही योजना, सवलती सुरू केल्या. त्या कोविड संपल्यावर बंद कराव्या लागल्या. काही वेळा केंद्र शासनाकडून राज्याकडील योजनेप्रमाणेच लाभ देणारी नवीन योजना येते. डबल योजना नको म्हणून आणि राज्याचा खर्च वाचावा म्हणून आपली योजना आपण बंद करतो. यात काहीचं चुकीचं नाही. यापूर्वीही हे अनेकवेळा झालेलं आहे. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, असा गैरसमज पसरवू नका”, असं आवाहनही अजित पवारांनी केलं.

Story img Loader