नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, ठाणे येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूसत्राप्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत सरकारवर टिकास्र डागलं होतं. त्यानंतर, आता युवा नेता आदित्य ठाकरे खुद्द संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाला भेट देण्याकरता गेले आहेत. रुग्णसंख्या, औषधांची मागणी, उपलब्ध साठा, रुग्णांना असणाऱ्या असुविधा आणि रिक्त पदांसदर्भात त्यांनी अधिष्ठांताकडून माहिती घेतली. त्यानंतर, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.
“मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात ज्या घटना झाल्या त्यात नांदेडमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. छत्रपती संभाजी नगर, नागपूरसह विविध शहरांतूनही अशा घटना पुढे आल्या. साधारपणे सरकारी रुग्णालयात औषधे कोणती घ्यायची हे सांगितलं जातं. परंतु, ही औषधं बाहेरून आणायला सांगितलं जातं. या प्रकरणात राजकारण करता आलं असतं. मोर्चे, आंदोलनेही काढता आली असती. पण या प्रकरणात सरकार कुठेच दिसत नाही. त्यामुळे विरोधक असल्याच्या नात्याने आपण रुग्णालय अधिष्ठांतांशी चर्चा करून समस्या सोडवणार आहोत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आम्ही परिस्थिती समजून घ्यायला आलो आहोत
“२९ जुलै रोजी मी ट्विट केलं होतं. त्यावेळी केईएम रुग्णालयाच्या काही लोकांना घेऊन मोर्चा काढला होता. सरकारचे डोळे उघडण्याकरता हा मोर्चा होता. राज्यभरातून मेसेज येत होते की औषधे कमी पडत आहेत. एकंदर डॉक्टर आणि डीनवर प्रेशर वाढत होता, औषधे नाहीत तर करायचं काय. आजही आम्ही आरोप लावण्याकरता नाही तर परिस्थिती समजून घ्यायला आलोय”, असंही ठाकरे म्हणाले.
“कुठेही घटना घडली की शासकीय अधिकाऱ्यांची बदली केली जाते, डीनवर केसेस टाकल्या जातात. डॉक्टरही दिवसरात्र मेहनत करत असतात. कोविड काळातही याच डॉक्टर, डीनमुळे जगभरात महाराष्ट्राचं कौतुक झालं”, असंही ते म्हणाले.
जबाबदारी ढकलू नका
“तुम्ही राजीनामा देणार नाहीत, कारण तुमच्यात लाज उरलेली नाही. पण जबाबदारी ढकलू तरी नका ही आमची विनंती आहे”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच, “जालन्यात लाठीचार्ज झाल्यावर आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित केलं गेलं. तो प्रश्न संपला. पण हे कार्यक्रम जे राजकीय नेते घडवून आणतात ते पुढे येऊन जबाबदारी घेणार आहेत का? या सरकारला लाज नाही. हे सरकार नांदेडपर्यंत पोहोचलेलं नाही”, असा हल्लाबोलही त्यांनी केली.