“राज्यात अचानक औरंग्याची पैदास वाढू लागलीय… ती ज्यांनी जन्माला घातलीय, त्या महाविकास आघाडीच्या पैदावारांचा डीएनए आणि औरंगजेबाचा डीएन एकच असावा”, असं वक्तव्य करत भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. यावरून राज्यातील राजकारण पेटलं आहे. त्यांनी या वाक्याचं स्पष्टीकरणही दिलं होतं. आता यावरून जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
कोल्हापुरात औरंगाबादचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवल्याप्रकरणी दंगल उसळली होती. तेव्हापासून राज्यातील राजकारणात ‘औंरग्याची पैदास’वरून राजकारण सुरू आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले असून त्यांनी एकमेकांवर आगपाखड केली जात आहे. यातूनच, चित्रा वाघ यांनी “संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी आपला डीएनए एकदा टेस्ट करून घ्यावा”, असं ट्वीट केलं होतं.
हेही वाचा >> “‘मातोश्री’ लोकांच्या दरवाजावर कटोरा घेऊन जाते, याचं…”, शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?
“राज्यात अचानक औरंग्याची पैदास वाढू लागलीय… ती ज्यांनी जन्माला घातलीय, त्या महाविकास आघाडीच्या पैदावारांचा डीएनए आणि औरंगजेबाचा डीएन एकच असावा. अन्यथा काही तरूणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याप्रकरणी राज्यातील परिस्थिती संवेदनशील असताना महाविकास आघाडीच्या वाचाळवीरांकडून दंगे भडकवण्याचं काम झालं नसतं. हे सगळं ठरवून केलं जातंय, हे जनताही पाहतेय. सर्वज्ञानी संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांनी तर खरंच आपला डीएनए एकदा टेस्ट करून घ्यावा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना विनंती आहे की, त्यांनी औरंग्याच्या औलादींचा बंदोबस्त करावा, ही निजामीवृत्ती आज ठेचली तरच कायमची अद्दल घडेल”, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं होतं.
जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया काय
“माझा डीएनए जेव्हा तुम्ही काढता चित्राताई, तेव्हा तो माझ्या आईच्या चारित्र्यावर हल्ला असतो. आणि मी पुन्हा निक्षून सांगतो, कळत नकळत जरी माझ्या आईची बदनामी आपण केलीत, तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल,” अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी ९ जून रोजी दिली होती. त्यानंतर, आज पुन्हा त्यांनी सविस्तर सोशल मीडिया पोस्ट लिहून चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.
तुम्ही माझ्या आईच्या चारित्र्यावरच गेलात
“DNA हा शास्त्रीय शब्द आहे. स्त्री पुरुष संभोगातून जेव्हा मुलाला किंवा मुलीला जन्म दिला जातो तेव्हा त्या स्त्री आणि पुरुषांचे जणूके त्या बालकामध्ये आढळतात. नजीकचे उदाहरण म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायणदत्त तिवारी ह्यांच्यावर एका तरुणाने आरोप केला कि तेच माझे वडील आहेत. अर्थात त्याच्या आईची त्याला साथ होती. नारायणदत्त तिवारी यांनी ते नाकारलं पण कोर्टाने DNA टेस्ट करायला सांगितली आणि हे स्पष्ट झालं कि नारायण दत्त तिवारी हेच त्याचे वडील आहेत”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
ते पुढे म्हणतात की, “जेव्हा आपण जा तुझी DNA टेस्ट करून ये असं म्हणतो तेव्हा आपण त्या मुलाच्या आईच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत असतो. तेव्हा कोणाच्याही आईवर संशय व्यक्त करण्याचा अधिकार कोणीच कोणाला दिलेला नाही. मराठी साहित्यामध्ये आईच्या वेगवेगळ्या कविता आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठी मनाला भावणारी कविता आहे…”आई सारखे दैवत ह्या जगतामध्ये नाही.”
“तुम्ही माझं DNA चेक करायला सांगता याचा अर्थ तुम्ही माझ्या आईच्या चारित्र्यावरच गेला होतात. लोक मला म्हणतात तू असं का बोललास. तर त्या लोकांनी समजून घ्यावं कि मी माझ्या मनाला चिमटा काढणारी गोष्ट सहन करीत नाही. राजकारण गेलं खड्ड्यात. माझ्या फेसबुक तसेच ट्वीटरच्या प्रवासात गेल्या १० वर्षांत 2 स्त्रियांना मी उत्तरे दिली आहेत. त्यामधील शेवटचे उत्तर ‘यांचा DNA तपासायला हवा’ हे बोलल्यानंतर दिले गेले आहे. माझ्या आई वडिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे वाक्य प्रयोग करायचे हे ऐकून घेणाऱ्यातला मी माणूस नाही. परत एकदा सांगतो राजकारण गेलं खड्ड्यात. संबंधित व्यक्तीने अनेक वेळा माझ्या वर हल्ले चढवले. मी उत्तर दिले नाही. कधीतरी वेळ येते सांगायची, मलाही लिहिता बोलता येते”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.