प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांना आपल्या अभिनयाने सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. चित्रपट हिंदी असो वा मराठी नाना पाटेकर यांचा अभिनय नेहमीच लक्षात ठेवण्यासारखा असतो. त्यांनी आतापर्यंत बरेच हीट चित्रपट दिले आहेत. नुकतंच नाना पाटेकर यांनी कोल्हापूरच्या कागल येथे चार महापुरूषांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे देखील उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर आणि हसन मुश्रीफ यांच्या मैत्रीची अनोखी गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमासाठी नाना पाटेकर यांचा मुक्काम जवळच्या एका हॉटेलमध्ये करण्यात आला होता. हसन मुश्रीफ यांना याबाबतची माहिती समजताच ते स्वत: नाना पाटेकर यांच्याकडे गेले. त्यांनी नानांचे खास पद्धतीने स्वागतही केले. मुश्रीफ भेटण्यासाठी येत असल्याचे समजताच नाना पाटेकर हे खोलीच्या बाहेर येऊन उभे राहिले. मुश्रीफ समोर येताच नानांनी त्यांची गळाभेट घेतली.

मराठी सिनेसृष्टीत सई ताम्हणकरने रोवला मानाचा तुरा, ‘IIFA’ मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराने गौरव

यावेळी नाना पाटेकर मुश्रीफ यांना म्हणाले, ‘अरे तू इकडे कशाला आलास? मीच तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे येणार होतो’. त्यावर उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, ‘असं कसं? पाहुण्यांचे स्वागत,आदरातिथ्य करणं हे आम्हा कोल्हापूरकरांचे संस्कार आहेत’. यावेळी नाना पाटेकर यांनी हसन मुश्रीफ यांचा एकेरी केलेला उल्लेख पाहून सर्वजण चकित झाले.

त्यावर नाना म्हणाले, “हसन हा माझा जवळचा दोस्त आहे रे. उगाच गैरसमज करून घेऊ नका. काही दिवसांपूर्वी मुंबईत रस्त्याने जात असलेला हसन मला दिसला. मी ‘हसन..हसन असे म्हणत निघालो. या घाईत मी माझी गाडी दुसऱ्याला धडकली होती”, असा एक किस्साही नानांनी सांगितला.

दरम्यान यावेळी महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम सोहळा पार पडला. या कार्यक्रमात भाषण देतेवेळी नाना पाटेकर म्हणाले, ‘फक्त महापुरुषांचे पुतळे उभारून चालणार नाही. त्यांच्या विचाराने जाण्याची गरज आहे.’

“गेल्या २५ वर्षांपासून मुश्रीफ निवडून येतात ही साधी गोष्ट नाही. पुढच्या निवडणुकीत ते उभे आहेत असे म्हटलं तर लोक निवडून देतील. पण सत्ताधाऱ्यांनी आमच्यासारख्या सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत, असेही नाना पाटेकर म्हणाले. इतक्यावरच न थांबता नाना पाटेकर यांनी मुश्रीफ यांना थेट अभिनय क्षेत्रात येण्यासाठी ऑफर दिली. तुम्ही अभिनय क्षेत्रात या, मी राजकारणात येतो”; असे नाना पाटेकर यावेळी म्हणाले. यानंतर उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You will started acting i get into politics actor nana patekar direct offer to minister hasan mushrif nrp