सांगली : काढणीला आलेल्या द्राक्षाला चार किलोला ७०० रुपये उच्चाकी दर निश्‍चित झाला. बाग काढणी सुरू होणार एवढ्यात अवकाळीने धूळधाण केली. काढलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेने ग्रासलेल्या तरुण शेतकर्‍याने आत्महत्या करण्याचा प्रकार कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे घडला. शुक्रवारी या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करीत जास्तीत जास्त मदत शासनाकडून देण्यात येईल असे आश्वस्त केल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शुक्रवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठाण मांडले असून शुक्रवारअखेर जिल्ह्यात ४ हजार १८५ हे. क्षेत्रावरील फळपिकांचे नुकसान झाले असून कवठेमहांकाळ तालुक्यातील आगाप द्राक्ष बागांची धूळधाण झाली असल्याचे पालकमंत्री खाडे यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सांगितले. अद्याप पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता असून होणार्‍या नुकसानीची माहिती दररोज सादर करण्याचे आणि अंतिम नुकसानीचा अंदाज पंचनामे करून हिवाळी अधिवेशनापूर्वी सादर करण्याचे आदेश आपण प्रशासनाला दिले असल्याचे सांगितले. यामध्ये सर्वात जास्त नुकसान द्राक्ष पिकाचे झाले असून कवठेमहांकाळ तालुक्यात पोटरीला आलेले ज्वारीचे पिकही भुईसपाट झाले आहे. तर पावसाने द्राक्ष बागा वाचविण्यासाठी औषध फवारणीही अशक्य झाल्याने नुकसानीत वाढ होणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – सोलापूर : पंढरपुरात विठ्ठलाची प्रक्षाळपुजा संपन्न, नित्योपचार पूर्ववत, देवाचा शिणवटा जावा यासाठी आयुर्वेदिक काढा

हेही वाचा – “२४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा…”, जरांगे-पाटलांनी सरकारला दिला थेट इशारा

कोंगनोळी येथील शेतकरी गुंडा लक्ष्मण वावरे (वय २७) या तरुण शेतकर्‍याने अवकाळीने झालेल्या नुकसानीमुळे गुरुवारी आत्महत्या केली. त्याची एक एकर द्राक्ष बाग असून व्यापार्‍यांनी त्याच्या मालाला चार किलोसाठी ७०० इतका उच्चाकी दर देऊ केला होता. मात्र, अवकाळीने बागच गेली. त्याच्यावर अडीच लाख रुपये कर्ज असून ते कसे फिटणार या विवंचनेत त्यांने आत्महत्या केली. कुटुंबाला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत तातडीची मदत देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे खाडे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young farmer commits suicide due to loss of grapes incident at kongnoli ssb
Show comments