विश्वास पवार, लोकसत्ता
वाई : स्ट्रॉबेरी म्हटले की, लालचुटूक रंग आणि आंबट-गोड चव असे चित्र डोळयांपुढे उभे राहते. मात्र हेच स्ट्रॉबेरी फळ पांढऱ्या रंगात दिसले तर? वाईमधील एका तरुण शेतकऱ्याने चक्क अशाच पांढऱ्या स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. नेहमीच्या लाल फळाच्या तुलनेत या पांढऱ्या रंगातील स्ट्रॉबेरीचे उत्पादनही अधिक मिळाले आहे आणि त्यास बाजारात दरही जास्त मिळत आहे. यापूर्वी अमेरिकेत होणाऱ्या या पांढऱ्या स्ट्रॉबेरीचा भारतातील लागवडीचा हा पहिलाच प्रयोग आहे.
हेही वाचा >>> “शपथ पूर्ण केलीत, मग आता…”, छगन भुजबळांचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर हा परिसर स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. याच भागातील वाई, फुलेनगर येथील तरुण शेतकरी उमेश दत्तात्रय खामकर यांनी हा पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग केला आहे. खामकर अनेक वर्षांपासून सतत नवनवे प्रयोग करत आले आहेत. स्ट्रॉबेरी उत्पादनाचा त्यांचा चांगला अभ्यासही आहे. याबाबत ते परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करतात. यातूनच त्यांनी अमेरिकेत होणाऱ्या पांढऱ्या रंगातील स्ट्रॉबेरीचा अभ्यास केला आणि आपल्याकडे प्रयोग केला. यासाठी त्यांनी संबंधित ‘फ्लोरिडा पर्ल’ या प्रजातीचे बियाणे मिळवले. या उत्पादनासाठी आवश्यक तयारी, काळजी घेत त्यांच्या अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये पांढऱ्या स्ट्रॉबेरीची दहा हजार रोपे लावली. नुकतीच या झाडांना फळे लागली आहेत. सुरुवातीला पांढरे दिसणारे हे फळ पिकले की फिकट गुलाबी रंगाचे होते. लाल स्ट्रॉबेरी साधारण आंबट-गोड असते, तर या पांढऱ्या फळांची चव गोड आहे.
‘फ्लोरिडा पर्ल’ या प्रजातीचे उत्पादनही नेहमीच्या स्ट्रॉबेरीपेक्षा एकरी सहापट अधिक मिळत असल्याचे खामकर यांच्या लक्षात आले. रंगात बदल झाल्यामुळे बाजारपेठेत या फळांना मागणी कशी असेल, अशी शंका त्यांना होती. मात्र, या पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीची मागणी वाढू लागली आहे आणि दरही जास्त मिळत आहे. लवकरच या फळांची ‘ऑनलाइन’ विक्री सुरू होणार आहे. या आगळयावेगळया उत्पादनाविषयी परिसरात कुतूहल असल्याने खामकरांच्या शेताला प्रयोगशील शेतकरी भेट देत आहेत. वर्षांनुवर्षे लालबुंद स्ट्रॉबेरी खाणाऱ्या ग्राहकांना तिचे हे नवे रूप आकर्षित करणारे आहे. या स्ट्रॉबेरीने परदेशातील ग्राहकांनाही भुरळ पाडली आहे. आपल्या देशातही तिला चांगली मागणी आहे. स्ट्रॉबेरीचा ग्राहक लक्षात घेता त्याला नवनवीन प्रकारच्या स्ट्रॉबेरी खाण्यामध्ये अधिक रस असतो. – उमेश खामकर, प्रगतीशील शेतकरी, वाई