कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया (नाशिक विभाग) यांच्या वतीने देण्यात येणारा ‘यंग आयटी प्रोफेशनल’ नाशिक विभागीय पुरस्कार येथील ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्राय. लिमिटेडच्या संघाला प्रदान करण्यात आला. सीएसआय संस्थेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर सहस्रबुद्धे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. दुसरे पारितोषिक पुण्याच्या परसिस्टन्स सिस्टम्सला मिळाले. माहिती तंत्रज्ञानातील संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सीएसआयच्या वतीने १९९९ पासून या वार्षिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. ३५ वर्षांखालील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांना विशेष कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित केले जाते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते, तंत्रज्ञ व तज्ज्ञांसाठी ही स्पर्धा खुली असते. या वर्षी महाराष्ट्र व गोवा राज्यांतील या क्षेत्रातील आघाडीचे कंपन्यांचे आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. महिरावणी येथील संदीप फाऊंडेशनमध्ये प्रादेशिक पातळीवरील स्पर्धेचा टप्पा पार पडला. त्यास ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन्सचे हृषीकेश जाधव व हुसेन दाहोडवाला यांच्या संघाने ‘इन्लाइट क्लाऊड’ या नावीन्यपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण केले. या प्रकल्पाने स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या विभागीय स्पर्धेच्या माध्यमातून कंपनीच्या संघाची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा कोइम्बतूर येथे ६ मार्च रोजी होणार आहे. या यशाबद्दल ईएसडीएसचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी यांनी तंत्रज्ञांचे अभिनंदन करताना ‘इन्लाइट क्लाऊड’ हे कंपनीचे सवरेत्कृष्ट संशोधन असल्याचे सिद्ध झाल्याचे नमूद केले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील चांगली संशोधने ही केवळ महानगरांमध्ये होतात, हा समजही यानिमित्ताने दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader