नांदेड : नांदेड शहरालगत असलेल्या सुगाव येथे नितीन प्रभू शिंदे या १९ वर्षीय तरुणाने प्रेमप्रकरण आणि त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांकडून झालेल्या अपमानामुळे २० मार्च रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर या मुलाच्या वडलांच्या तक्रारीवरून लिंबगाव पोलीस ठाण्यात मुलीकडच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुगाव येथील नितीन प्रभू शिंदे या तरुणाचे गावालगतच्याच थुगाव येथील एका युवतीशी प्रेमसंबंध होते. गेल्या वर्षभरापासून असलेल्या या प्रेमसंबंधाची माहिती ग्रामस्थांना कळाल्यानंतर दोन्ही गावांमध्ये हे प्रकरण चर्चेमध्ये होते. पण मुलीच्या नातलगांचा या प्रेमसंबंधाला विरोध असल्याचे दिसून आल्यानंतर मुलाच्या पालकांनी मुलीची समजूत काढून बघितली. पण नितीनसोबत विवाह करण्यावर ती ठाम होती.

१७ मार्च रोजी या प्रेमप्रकरणावरून मुलीच्या नातेवाईकांनी नितीन शिंदे याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलीच्या काही नातेवाईकांनी नितीन शिंदे याला घरी जाऊन मारहाण केली शिवाय गावातून त्याची धिंड काढण्यात आली. नांदेडच्या एका कापड दुकानात काम करणारा नितीन मारहाणीच्या प्रकारानंतर तणावात होता. २० मार्च रोजी आई-वडील शेतामध्ये कामास गेल्यानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे वरील दोन्ही गावांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणातील काही संभाषणं प्रसृत झाले असून मुलीच्या एका नातलगाने नितीन याच्यावर दबाव आणल्याचे त्यातून स्पष्ट झाले.

वरील घटनेनंतर नितीनचे वडील प्रभू शिंदे यांनी लिंबगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात विक्रम ज्ञानदेव भोसले, नितीन भीमराव भोसले, ज्ञानदेव केशवराव भोसले, संतोष केशवराव भोसले, अर्जुन संतोष भोसले, संतोष भगवानराव भोसले व अस्मिता संतोष भोसले (सर्व रा. थुगाव, नांदेड) या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला असला, तरी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांनी यश आले नाही. आरोपींपैकी काही जण वाळूमाफिया असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागली नसल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा तपास लिंबगावचे साहाय्यक पोलीस निरीक्षक बोधनकर हे करीत आहेत.