सोलापूर : दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाला लोणावळा व पुढे खोपोली येथे बोलावून घेतले आणि त्याच्याकडून दहा लाखांची रोकड घेतली. नंतर दामदुप्पट रक्कम घेऊन जाण्यासाठी काहीवेळ थांबविल्यानंतर पोलिसांच्या वेशातील चार जणांनी छापा घातल्याचा देखावा करून त्या तरुणाला तेथून हिसकावून लावले. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर शेवटी त्या तरुणाने नातेपुते पोलीस ठाण्यात धाव घेऊन एका महिलेसह सात जणांविरुध्द फिर्याद दाखल केली.

प्रणव प्रभाग (वय ३४, रा. फलटण, जि. सातारा) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रणव यांचा व्यापार व्यवसाय आहे. नातेपुते (ता. माळशिरस) येथे एका महिलेसह दोघांनी विशाल पाटील नावाच्या तरुणाशी त्याची ओळख करून दिली. पाटील याने आपण दामदुप्पट पैसे मिळवून देतो. आतापर्यंत अनेक व्यक्तींना दामदुप्पट रक्कम मिळवून दिल्याचे सांगत प्रणव यांना भुरळ पाडली. पाटील याने दहा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास त्याच्या दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले. त्यास बळी पडत प्रणव हा दहा लाखांची गुंतवणूक करण्यास तयार झाला.

ठरल्याप्रमाणे त्यास पुणे जिल्ह्यातील माळेगावच्या संबंधित महिलेसह सातारा जिल्ह्यातील कोरडगावच्या तरुणाने मोटारीने लोणावळा येथे नेले. तेथे भेटलेल्या विशाल पाटील याने पुढे खोपोलीत नेले आणि त्याच्याकडून दहा लाखांची रोकड घेतली. नंतर दामदुप्पट रक्कम मिळण्यासाठी काही वेळ थांबण्यास सांगितले. परंतु त्याचवेळी पोलिसांचा पोशाख घातलेल्या चार जणांनी तेथे बोलेरे वाहनातून येऊन विशाल पाटील यास ताब्यात घेण्याचा देखावा करीत प्रणव यांना हुसकावून लावले. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर शेवटी प्रणव यांनी नातेपुते पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदविली.