लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग : पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केल्याची बाब रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील माडप कातकरवाडी येथे समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलीसांनी जेरबंद केले आहे. सुमित काशिनाथ कातकरी असे अटक करण्यात आलेल्या २२ वर्षीय तरूणाचे नाव आहे.

खालापूर तालुक्यातील माडक कातकरवाडी येथे एका वयोवृध्द महिलेचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात, तिच्या राहत्या घरातील पलंगावर आढळून आला होता. याबाबतची माहिती मिळताच खालापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली होती. तेव्हा वृध्द महिलेला धारधार शस्त्राने कपाळावर, डोक्यावर आणि नाकावर वार करून वार करून तिची हत्या करण्यात आल्याचे दिसून आले होते.

आणखी वाचा-ED Raids in Mumbai : टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; मुंबई, जयपूरसह १० ठिकाणी छापेमारी

पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश खालापूर पोलीसांना दिले होते. यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनीही घटनास्थळाची पहाणी केली. यानंतर या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेची हत्या नेमकी कोणी आणि का केली याचा शोध घेणे पोलीसांसमोरील सर्वात मोठे आव्हान होते. नातेवाईकांकडे चौकशी करून काही पुरावा हाती लागत नव्हता. त्यामुळे तपासाला दिशा मिळत नव्हती. पुन्हा एकदा सर्व नातेवाईकांकडे या बाबत वेगवेगळे बोलावून चौकशी करण्यात आली. यावेळी मयत वृध्द महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब असल्याची बाब पोलिसांना सांगितले. त्यामुळे चोरीच्या उद्देशानेच ही हत्त्या झाल्याचा संशय पोलीसांना आला. या माहितीचा आधार घेऊन पोलीसांनी आपल्या तपासाला दिशा दिली. न्यायवैद्यक पथकांना पाचारण करण्यात आले. तांत्रिक पुरव्यांची जुळवाजुळव केली गेली.तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण आणि आजुबाजूच्या लोकांकडून मिळालेली माहिती संकलित करून कौशल्यपूर्ण तपास करत पोलीस अखेर आरोपी पर्यंत पोहोचले.

आणखी वाचा-Sanjay Raut : “…तर वीर सावरकरांचाही गौरव ठरेल”, बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून संजय राऊतांचं विधान चर्चेत!

वृध्द महिलेच्या नातवानेच तिचा खून केल्याची बाब समोर आली. सुमित याने वडलांना न सांगता मोटर सायकल १५ हजार रुपयांसाठी गहाण टाकली होती. ही मोटरसायकल सोडविण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. वडिलांकडून गाडी कुठे आहे अशी विचारणा होत होती. त्यामुळे पैश्यांसाठी त्याने आजीच्या अंगावरील दागिने चोरून मोटर सायकल सोडविण्याचा निर्णय घेतला. आजी घरात एकटीच झोपत असल्याचा फायदा घेऊन तो घरात शिरला. त्याने तिचा खून केला. नंतर तिच्या अंगावरील दागिने घेऊन पसार झाला होता.

या गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक सचिन पवार, सपोनि संतोष अवटी, मनिष मोरे, पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार, सरिता मनवर, शिवाजी जुंदरे, सहा. फौजदार सुभाष म्हात्रे, मोहन भालेराव, पोलीस हवालदार- नितीन शेडगे, अमित सावंत, निलेश कांबळे, हेमंत कोकाटे, शरद फरांदे, मनोज सिरतार, रणजित खराडे, महिला पोलीस हवालदार – हेमा कराळे पोलीस शिपाई- आशिष पाटील, गिरीश नगरकर, तुषार सुर्यवंशी, शरद हिवाले यांनी महत्वाची भूमिका बजावली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man kills grandmother for greed for money in raigad mrj