नांदेड : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पोलिस यंत्रणा रस्त्यावर असताना रात्री शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे २० तास उलटले तरीही या प्रकरणात पोलिसांनी कोणत्याही गुन्ह्याची नोंद केली नव्हती. सोमवारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर होते.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्दळीचे ठिकाण मानल्या जाणा-या गंगा हाॅस्पिटलच्या मागील परिसरात काही अज्ञात तरुणांनी तिघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात खडकपुरा परिसरातील रहिवासी राहुल विनोद दिपके (वय २०) याचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन हर्ष विलास दिपके (वय १७) व सचिन जनार्धन हटकर (वय ३५) हे दोघे जखमी झाले. या तिघांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी राहुल दिपके याला मृत घोषित केले. अन्य दोन जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली.

या घटनेनंतर सुरुवातीला शिवाजीनगर पोलिसांनी हद्दीचे कारण दाखवत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. रेल्वे पोलिसांकडून हद्द स्पष्ट झाल्यानंतर रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. एवढी गंभीर घटना होऊनही तब्बल २० तास गुन्हा दाखल करण्यास वेळ दाखल्याने पोलिसांची निष्क्रियता समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे जनसंपर्क विभाग किंवा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबतची कोणतीही माहिती माध्यमांना मिळाली नाही. या घटनेनंतर मयत राहुल दिपके याची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर कायदेशीर सोपस्कार पुर्ण केल्यानंतर सायंकाळी उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नाही. ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली व कोणी केली हे अद्याप स्पष्ट नसल्याचे पोलिसांनी सांगितले.