विदर्भ प्रांत वार्षिक बैठकीत चिंता आणि चिंतन
संघाच्या सायंकालीन कायम शाखा मोठय़ा प्रमाणात बंद पडत असून, तरुण स्वयंसेवक मिळत नसल्याची गंभीर चिंता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत वार्षिक बैठकीत व्यक्त करण्यात आली. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असतांना संघाशी तरुण एकरूप होत नसल्याबद्दलचे गंभीर चिंतन या बैठकीत करण्यात आले.
येथील महेश भवनात संघाच्या विदर्भ प्रांताच्या तीन दिवसीय वार्षिक बैठकीचा समारोप संघाचे सरकार्यवाह भयाजी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाला. केंद्र व राज्यात स्वयंसेवक राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. असे असतांनाही संघाच्या सायंकालीन शाखा सातत्याने कमी होत आहेत. एकटय़ा विदर्भाची स्थिती बघितली तर संघ मुख्यालय नागपुरात असतानाही संघाच्या कायम शाखांची संख्या दोन हजारांवर आली आहे. विशेष म्हणजे, कधी काळी त्या सात हजारांवर होत्या. त्यामुळे शाखांची संख्या कशी वाढविता येईल, याचा ठोस तीन वर्षांचा कार्यक्रम तयार करण्यात आला. पूर्वी संघात विविध मैदानी, बौध्दिक व मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. तेव्हा मनोरंजनाची साधने नसल्यामुळे तरुण संघ शाखेत येत होते. मात्र, आज टीव्ही, विविध वाहिन्या, बदलते अभ्यासक्रम, शैक्षणिक स्पर्धा, शिकवण्यांमध्ये तो गुंतला आहे. त्यांना संघकार्याकडे कसे वळवता येईल, यावरही चिंतन करण्यात आले. आज अभियांत्रिकी, बी.कॉम., बी.ए., तसेच विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र शाखा संघाने सुरू केल्या असून, त्या अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. शाखेला दररोज एक तास देणाऱ्या कार्यकर्त्यांंची संघाकडे वानवा आहे. त्यामुळे तरुणांना हाताशी धरून असे कार्यकर्ते तयार केले जाणार आहेत.
चंद्रपुरात आज १८ शाखा आहेत. गेल्या वष्रेभरात सहा शाखांची वाढ झालेली आहे. जिल्ह्य़ात १२२ शाखा आहेत.
संघाच्या कायम शाखांचे प्रमाण कमी झाले, ही वस्तुस्थिती आहे. तरुणाई संघाशी जुळली जात नाही किंवा एकरूप होत नाही, असे बोलले जाते. मात्र, हे अर्धसत्य आहे. आजही संघ शाखा सुरू असून तेथे १० ते १२ तरुण नियमित येतात. बहुतांश तरुण वेगवेगळ्या मार्गांनी संघाशी जुळलेले आहेत. प्रत्येकाने संघात हाफ फॅन्ट व पांढरा शर्ट लावून आलेच पाहिजे, असे नाही. तीन दिवसांपूर्वीच आम्ही तरुणांसाठी एका विशेष कार्यक्रम घेतला. त्यात ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. संघाचे काम ठराविक अजेंडय़ानुसार सुरू आहे.
-वसंतराव थोटे, जिल्हा संघचालक, चंद्रपूर</strong>