लक्ष्मण शंकर जाधव या ३२ वर्षीय तरुणाने आपल्या ७ व ११ वर्षीय मुलांना विहिरीत ढकलून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना पाटण तालुक्यातील थिवशी गावात घडली.
लक्ष्मण शंकर जाधव (वय ३२, रा. थिवशी, ता. पाटण, हल्ली रा. भिवंडी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. त्याचा मुलगा अभिषेक (वय ११), दुसरा मुलगा ओंकार (वय ७) यांचा मृतदेह विहिरीत आढळला असल्याची माहिती पाटण पोलिसांनी दिली. विहिरीजवळच असलेल्या झाडावर लक्ष्मणचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढल्याने त्याने मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. लक्ष्मण जाधव हा चालक असून, त्याचे स्वत:चे वाहन आहे. तो भिवंडी येथे वास्तव्यास आहे. त्याचे आईवडील मूळगावी थिवशी येथे राहतात. प्राथमिक माहितीनुसार, जाधव कुटुंबात काही घरगुती कलह आहेत. अभिषेक आणि ओंकार ही मुले भिवंडीला वडिलांकडे होती, तर सुटीमुळे लक्ष्मणची पत्नी पुण्याला गेली होती. दरम्यान, लक्ष्मणची आई काही दिवसांपूर्वी भिवंडीला जाऊन दोन्ही नातवांना घेऊन गावी आली होती. लक्ष्मण काल गावी आला. लक्ष्मण आणि त्याचे वडील शंकर हे दुपारी एक वाजता खत खरेदी करण्यासाठी पाटणला जाऊन आले. दुपारी चारच्या सुमारास शंकर हे गुरे चारण्यासाठी घराबाहेर पडले. गावापासून काही किलोमीटर अंतरावर धारेश्वर-दिवशी हे देवस्थान आहे. आपण मुलांना घेऊन तिकडे जाणार आहोत असे लक्ष्मणने वडिलांना सांगितले होते. सायंकाळी शंकर जाधव घरी आले, तेव्हा लक्ष्मण आणि मुले दिसली नाहीत. साडेसहानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली. थिवशीच्या दिशेने शोध घेतला असता, किरा नदीच्या काठावर असणाऱ्या विहिरीत अभिषेकचा मृतदेह तरंगताना आढळला. विहिरीपासून थोडय़ा अंतरावर असलेल्या झाडाला लक्ष्मणने गळफास घेतल्याचे दिसले. ओंकारचा शोध घेण्यात आला असता त्याचाही मृतदेह याच विहिरीत मिळून आल्याचे पाटण पोलिसांनी सांगितले. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्मा कदम या करीत आहेत.

Story img Loader