शहरातील कांदा व भुसार मालाचे व्यापारी विठ्ठलदास लुटे यांच्या मुलाचे अज्ञात तीन ते चार आरोपींनी अपहरण करून सुटकेसाठी ३० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. ती न दिल्यास त्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास नगर-मनमाड राज्यमार्गावर साकुरी शिवारात घडली असून त्याने व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे.
कांदा व भुसार मालाचे व्यापारी विठ्ठलदास तुकाराम लुटे (वय ६०) राहणार साकुरी यांचा मुलगा चंदन विठ्ठलदास लुटे (वय ३६) यांचे साकुरी शिवारात नगर-मनमाड राज्यमार्गाच्या कडेला युनायटेड स्टील नावाचे फर्निचरचे दुकान आहे. चंदन हा गुरुवारी रात्री दुकान बंद करून मोटारसायकलने घराकडे जात असताना हॉटेल समाधानजवळ पाठीमागून काळ्या रंगाच्या इंडिगो कारमधून आलेल्या तीन ते चार आरोपींनी ही कार मोटारसायकलला आडवी घालून त्यास बळजबरीने कारमध्ये घालून पळवून नेले. घटनास्थळी त्याची मोटारसायकल पोलिसांना आढळून आली.
या चोरटय़ांनी नंतर चंदन लुटे याच्याच मोबाइलवरून त्याच्या घरच्यांकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास चंदन यास ठार मारण्याची धमकी दिली. विठ्ठलदास लुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी अज्ञात तीन ते चार चोरटय़ांविरुद्ध अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली. मात्र आरोपींचा अद्यापही ठावठिकाणा लागू शकला नाही. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी राहाता पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. अपहरण झालेल्या चंदन लुटे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली असून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे एक पथक शहरात तळ ठोकून आहेत. ते वेगवेगळ्या पद्धतीने या घटनेची चौकशी करीत आहे. या घटनेसंदर्भात राहाता पोलिसांनी लोणी येथील एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र तिच्या चौकशीतून काहीही निष्पन्न न झाल्याने पोलिसांनी त्या महिलेस सोडून दिले.
या घटनेमुळे राहाता शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. राहाता व शिर्डी परिसरात गुन्हेगारांचे मनोधैर्य उंचावले असून या गुन्हेगारी टोळ्यांना पायबंद घालण्यास पोलीस यंत्रणेस सातत्याने अपयश येत आहे. प्रचंड वर्दळ असताना राज्यमार्गावरून व्यापा-याचे अपहरण होण्याची राहाता शहरातील पहिलीच घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Story img Loader